दूध दरवाढीच्या विषयावरून महायुतीच्या तिसऱ्या टप्प्यातील आंदोलनाची घोषणा
सागर चव्हाण-तासगाव सांगली
राज्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी महायूतीतर्फे दोनदा आंदोलन करण्यात आले. राज्यभरातले दूध उत्पादक शेतकरी न्याय मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरले, पण राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या गंभीर परिस्थितीची काही एक पर्वा न करता या शेतकऱ्यांच्या समस्याकडे पूर्णत: दुर्लक्ष केले आहे. मात्र महायुतीतले घटक पक्ष असे शांत बसणार नाहीत. शेतकरी बांधवांना असे वाऱ्यावर सोडणार नाहीत, जोपर्यंत त्यांना अनुदान मिळत नाही. तोपर्यंत लढण्यासाठी हे दूध आंदोलन आणखीन तीव्र करण्याचा निश्चय महायुतीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
राज्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आज पून्हा एकदा महायुतीतील घटक पक्षांची बैठक आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीस विरोधी पक्षनेते ना. देवेंद्रजी फडणवीस, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील, विधानपरिषद विरोधी पक्षनेते आ. प्रवीण दरेकर, राष्ट्रीय समाज पक्षाचे आ. महादेव जानकर, रयत क्रांती संघटनेचे आ. सदाभाऊ खोत, शिवसंग्राम संघटनेचे आ. विनायक मेटे आणि रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) अविनाश महातेकर, भाजपा प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे व भाजपा प्रदेश किसान मोर्चा अध्यक्ष अनिल बोंडे उपस्थित होते.
दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर १० रू. अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावे, दूध भुकटीच्या निर्यातीसाठी प्रति किलो ५० रू. अनुदान द्यावे. किंवा राज्य सरकारने गायीचे दूध प्रति लिटर ३० रु. प्रमाणे खरेदी करावे या मागण्यांसाठी महायुतीतर्फे दोन वेळा राज्यभरात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला शेतकऱ्यांनी उत्तम प्रतिसाद देऊन आपल्या मागण्या सरकार दरबारी मांडल्या. माध्यमांनीही या आंदोलनाची दखल घेतली. मात्र राज्य सरकारने गेंड्याची कातडी पांघरून या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले आहे. दूध आंदोलनाचा हा विषय राज्य सरकारच्या अखत्यारीत येत असूनही हा विषयही केंद्र सरकारच्या माथी मारण्याचा प्रयत्न हे सरकार करीत आहेत. यावरून राज्य सरकार कशाप्रकारे आपल्या जबाबदारीची चालढकल करत आहे हे दिसून येते.
भाजपा सरकारच्या कार्यकाळात दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य अनुदान देऊन त्यांचा प्रश्न सोडवला होता. आत्ताचे सरकारही यासाठी बांधील आहे. तेव्हा हे दूध आंदोलन अधिकाधिक तीव्र करून शेतकऱ्यांना अनुदान मिळवून देण्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील आंदोलन दि. १३ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट या दरम्यान करणार असल्याचे यावेळी ठरले. आंदोलकांनी आपआपल्या घरात किंवा गोट्यामध्ये बसून सरकारचा निषेध करीत आंदोलनाचा पवित्रा घ्यावा. तसेच राज्याच्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्या मोतोश्री या निवासस्थानी ५ लाख निवेदनाची पत्रे पाठवणार असल्याचे सदर बैठकीत ठरले.