बालयोगी भगवान महाराजांनी लोटांगण घालत घेतले घृष्णेश्वराचे दर्शन,
तांदळवाडी हवेली ( बीड ) ते वेरुळ १७० किलोमीटर लोटांगण
विजय चौधरी, खुलताबाद
बीड जिल्ह्यातील तांदळवाडी हवेली येथील तपोभूमी संगमेश्वर महादेव मंदिर येथील भगवान बालयोगी महाराज यांनी तांदळवाडी हवेली ते वेरुळ हे १७० किलोमीटर अंतर २४ दिवसात लोटांगण घालत वेरुळ येथील श्री घृष्णेश्वराचे दर्शन घेतले.
करोनाच्या पार्श्वभूमीवर श्री घृष्णेश्वर मंदिर बंद असल्याने त्यांना बाहेरून द्वार दर्शन घ्यावे लागले. जगाचे कल्याण व्हावे, सर्वांचे भले व्हावे, सर्वत्र सुख शांती लाभावी, भरपूर पर्जन्यमान होऊन सुजलाम सुफलाम व्हावे यासाठी बीड जिल्ह्यातील तांदळवाडी हवेली ते वेरुळ लोटांगण घालत दर्शन केले.
मूळचे लिंबारुई येथील रहिवासी असलेले बालयोगी भगवान महाराज वयाच्या बारा वर्षांपासून अध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत आहेत. तांदळवाडी हवेली ता. जि. बीड येथून १३ जुलै पासून त्यांनी लोटांगण यात्रेस सुरुवात करून त्यांचे ५ ऑगस्ट रोजी वेरुळ येथे आगमन झाले. यावेळी वेरुळ ग्रामस्थांच्या वतीने गणेश हजारी यांनी महाराजांचे स्वागत केले. श्री घृष्णेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने संजय जोशी यांच्या हस्ते महाराजांचे पूजन करण्यात आले.
श्रावण महिन्यात वेरुळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिर येथे दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी येतात. मात्र यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद असले तरीही तांदळवाडी हवेली ता. जि. बीड येथील बालयोगी भगवान महाराज यांनी अक्षरशः लोटांगण घालत वेरुळ गाठले आहे.
सध्या वेरूळ परिसरातून राष्ट्रीय महामार्गावरून लोटांगण घालत पुढचा गाठणाऱ्या बालयोगी भगवान महाराजांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांना मदतसुद्धा देण्यात येत आहे. लोटांगण घालत ते ज्या गावातून जातात, तेथील रहिवासी भावनिक होऊन त्याचे कौतुक करीत आहेत.
लोकांकडून कौतुक, मदतीचा हात-
रस्त्यावरील वाहन यांची पर्वा न करता लोटांगण घालत घृष्णेश्वराला निघालेले बालयोगी भगवान महाराज हे जेथून जातील, तेथील लोकांच्या कौतुकाचा विषय ठरत आहेत. त्यामुळे शक्य तेवढी मदत त्यांच्याकडून केली जाते.
अनोख्या अनुष्ठानामुळे महाराज चर्चेत - बालयोगी भगवान महाराज अनोख्या साधना अनुष्ठानामुळे सतत चर्चेत असतात. त्यांनी दोन वर्षांपूर्वी तांदळवाडी ते परळी १२८ किलोमीटर अंतरावर लोटांगण घालत परळी वैजनाथ दर्शन केले आहे. दोन वर्षांपूर्वी ३५ दिवस दोन्ही पायांवर उभे राहून त्यांनी ओम नमः शिवाय चा जप केला आहे. वडाच्या झाडाला स्वतःला उलटे टांगून शीर्षासन अनुष्ठान केले आहे. काटेरी झुडपात निद्रा साधना केलेली आहे. एका पायावर सतत उभे राहून तपश्चर्या केलेली आहे.अमरनाथ व हिमालयात जाऊन साधना केलेली आहे.