रसायनशास्त्राचे 'आचार्य'!
भारतीय आधुनिक रसायनशास्त्राचे जनक मानले जाणारे आचार्य सर प्रफुल्ल चंद्र रे यांचा आज १५९ वा जन्मदिन. त्यांच्या स्मृतींना वंदन!
आजच्या दिवशी १८६१ साली खुलना जिल्ह्यात (आता बांगला देशात) जन्मलेल्या प्रफुल्ल चंद्रांनी स्वत: रसायनशास्त्रात मूलगामी संशोधन केलेच शिवाय कोलकात्यात निवृत्तीपूर्वी व नंतरही अध्यापन करून शेकडो विद्यार्थ्यांना रसायन शास्त्रातील संशोधनाची गोडी लावली.
त्यांच्या रसायनशास्त्र क्षेत्रातील कार्याची पावती म्हणून ब्रिटिश सरकारने १९१७ मध्ये त्यांना 'सर' हा किताब प्रदान केला.
एडिंबरो युनिव्हर्सिटी व कलकत्ता विद्यापीठांत अध्यापन केल्यानंतर वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी विद्यापीठीय अध्यापनातून निवृत्ती स्वीकारली.
डाॅ. प्रफुल्ल चंद्र यांनी ब्रह्मो समाजाच्या कार्याचा वसा त्यांच्या वडिलांकडून घेतला होता. तो पुढे चालवत ते समाजाचे कार्य करत राहिले. ते पुढे ब्रह्मो समाजाचे अध्यक्ष झाले.
त्यांनी रसायनशास्त्र विषयात विपूल ग्रंथलेखन केले. त्यांना देश-विदेशांतील अनेक विद्यापीठे व वैज्ञानिक संस्थांनी पदव्या व पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला.
डाॅ. प्रफुल्ल चंद्र रे यांनी 'A History of Hindu Chemistry from the Earliest Times to the Middle of Sixteenth Century' हा द्विखंडात्मक ग्रंथ लिहिला व भारतातील प्राचीन रसायनशास्त्रातील संशोधनाचा इतिहास जगासमोर आणला. हे कार्य ऐतिहासिक होते.
'बेंगाल केमिकल्स अँड फर्टिलायझर्स' ही रसायनशास्त्र व औषध क्षेत्रातील पहिली भारतीय कंपनी त्यांनीच सुरू केली.
रसायनशास्त्र संशोधन व समाजकारण या क्षेत्रात अथक काम करत राहिलेला एक ऋषितुल्य आचार्य काळाच्या पडद्याआड कायमचा अंतर्धान पावला.
- डॉ.भारतकुमार राऊत