अतिवृष्टीमुळे नदी, खाडी किनार्यावरील शेती पाण्याखाली; शेतकरी हवालदिल
कोरोनाचे संकट, त्यानंतर आलेले निसर्ग चक्रीवादळ, त्याला दोन महिने उलटत नाही तोच गेले तीन दिवस थैमान घालणार्या पावसामुळे म्हसळा तालुक्यातील नागरिक रडकुंडीला आले आहेत. अतिवृष्टीमुळे नदी, खाडीच्या किनार्यावर शेती करणारा शेतकरी शेती पाण्याखाली गेल्याने हवालदिल झाला आहे. या तुफानी पावसात जानसई नदीच्या प्रवाहात तरुण वाहून बेपत्ता झाला आहे. त्याचा अद्याप शोध लागलेला नाही.
आज (5 ऑगस्ट) म्हसळा तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले. म्हसळा तालुक्यालाही पावसाचा फटका बसला असून, येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोसाट्याच्या वार्यासह पडलेल्या पावसामुळे रस्ते, शेती पाण्याखाली गेल्या.
म्हसळा शहराला जोडणारा पाभरा रस्ता, दिघी रस्ता तर कधी नव्हे ते म्हसळा-माणगाव रस्त्यावरील पाभरे फाटा ते जान्हवी पेट्रोल पंपापर्यंत मुख्य मार्गावर पाणी आल्याने या मार्गावरची वाहतूक काही तासांसाठी बंद झाली होती. तसेच ढोरजे, आगरवाडा या गावांच्या मार्गावरसुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने या गावांचा संपर्क आज दिवसभर तुटला होता. तर माणगाव-दिघी मार्गावर नव्याने बांधलेल्या देवघर पुलावरूनदेखील पाणी गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, आधीच निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकासान भरपाईची रक्कम बँक खात्यात जमा झाली आहे की नाही, हे पाहण्यासाठी कोरोनाची भीती विसरुन गर्दी करणारा शेतकरी आजच्या अतिवृष्टीमुळे शेती संपूर्ण पाण्याखाली गेल्याने पुरता हवालदिल झाला आहे.
मुसळधार पावसामुळे तालुक्यातील म्हसळा-पाभरे रस्त्यावरील जानसई नदी दुथडी भरुन वाहत होती. आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास या नदीमध्ये पोहायला गेलेला बदर अब्दल्ला हळदे (रा. म्हसळा) हा 23 वर्षीय तरुण नदीच्या प्रवाहात वाहून गेला आहे. त्याचा शोध घेण्याचे काम सुरु असून, अद्याप यश आलेले नाही.
दरम्यान, हवामान खात्याने रायगडला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. पुढील दोन दिवस पावसाचा जोर जास्त असल्याने नदी-नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व वेगवान प्रवाह राहील. त्यामुळे कोणीही अशाप्रकारचे पाण्याच्या प्रवाहात जाऊ नये, जेणेकरुन जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच पालकांनीही आपल्या मुलांना पाण्याच्या प्रवाहात पाठवू नये. कोरोना व अतिवृष्टीच्या या काळात अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये, असे आवाहन तहसिलदारांकडून करण्यात आले आहे.