जय सिया राम!
जय राम! श्री राम!! जय जय राम!!! चा गजर करत शेकडो रामभक्तांच्या साक्षीने पावनभूमी अयोध्येत प्रभू रामचंद्रांच्या जन्मभूमीवरील ऐतिहासिक मंदिराचा शीलान्यास अयोध्येत थोड्याच वेळात संपन्न होत आहे. या निमित्त प्रभू रामचंद्रांच्या सर्व भक्तांचे अभिनंदन !
अयोध्येतील रामजन्मभूमीचा वाद गेली काही शतके चालूच आहे. पंतप्रधानपदी आल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी या समस्येची उकल करायचीच असा निर्धार करून हा प्रश्न न्यायालयातच सोडवायचा असा निर्णय घेतला व तसे करूनही दाखवले.
जसे घटनेतील ३७० कलम रद्द करून त्यांनी काश्मीरचा प्रश्न कायमस्वरूपी संपवला तसाच अयोध्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाचेच दरवाजे ठोठावून त्यांनी कौल मिळवला. बाबरीच्या खाली पुरातन मंदिराचे अवशेष सापडल्याने तिथे पूर्वी मंदिर होतेच हेही पुरातत्व संशोधनातून सिद्ध झाले. मुस्लिम समाजाच्या पुढाऱ्यांनी फार खळखळ न करता हे सत्य मान्य केले, हे चांगले झाले.
आता पायाभरणी झाल्यानंतर लवकरात लवकर मंदीराची उभारणी होईल व इतकी वर्षे बाहेरच निर्वासिताप्रमाणे ताटकळत राहिलेल्या रामलल्ला मंदिराच्या गाभाऱ्यात सन्मानाने प्रवेश करतील. भारतीयांच्या दृष्टीने तो दिवस स्वप्नपूर्तीचा असेल.
खरे तर सार्वजनिक जीवनात 'धर्म' आणू नये, असे मीही मानतो. पण 'राम' भारतीय जीवनात केवळ 'धार्मिक' नसून तो भारतीय जीवनात 'सांस्कृतिक' जीवनाचा अविभाज्य घटक आहे. म्हणूनच त्याचा उचीत सन्मान राखायलाच हवा.
राम जन्मभूमी मंदिर केवळ धार्मिक मंदिर न राहता भारताचे सांस्कृतिक केंद्र व्हावे, हीच अपेक्षा आहे. ती पुरी करण्याची जबाबदारी देशभर पसरलेल्या रामभक्तांची आहे.
जय श्री राम।
डॉ.भारतकुमार राऊत
रघुपती राघव राजाराम पतित पावन सिताराम ईश्वर अल्ला तेरो नाम सबको सन्मती दे भगवान। हे राम! महात्मा गांधीजी अमर रहे
ReplyDelete