'इस्रो'चा निर्माता!
एक काळ असा होता की भारतात केवळ सापांना खेळवणारे गारुडीच राहतात व भारतातील शहरांतली वाहतूकसुद्धा हत्तींवरून होते अशी स्वत:ची समजूत करून घेऊन आत्मानंद मिळवणारी पिढी पाश्चात्य जगात होती, त्या काळात भारताच्या आध्यात्मिक इतिहासाबरोबरच औद्याेगिक व वैज्ञानिक प्रगतीची ओळख या जगाला सप्रमाण करून देणाऱ्या होमी भाभा, सी. व्ही. रामण, जमशेटजी टाटा यांच्याबरोबरीने विक्रम साराभाई या अंतराळ संशोधकाचे नाव घ्यावे लागते. अशा भारतीय अंतराळ संशोधन युगाचे प्रवर्तक असलेले ज्येष्ठ भौतिक शास्त्रज्ञ डाॅ. साराभाई यांचा आज जन्मदिन.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या वैज्ञानिक प्रगतीत ज्यांनी नेतृत्व केले, त्यामध्ये डाॅ. होमी भाभा यांच्या बरोबरीने साराभाईंनी काम केले.अहमदाबाद येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) व इंडियन इन्स्टिट्यूट ॲाफ मॅनेजमेंट (आयआयएम) साराभाईंची कल्पकता, देशप्रेम व दीर्घदृष्टी यांचे दर्शन घडवतात.
१९७५ मध्ये जो पहिला अंतरिक्ष उपग्रह आर्यभट्ट अवकाशात सोडला गेला त्याची रचना विक्रम साराभाई यांच्या अहमदाबाद रिसर्च सेंटर मध्येच केली होती. आर्यभट्टच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारताने अनेक उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले. या यशामागे साराभाई यांच्या खंबीर नेतृत्वाचा मोलाचा वाटा आहे.
साराभाई यांचा जन्म अहमदाबाद येथील एका संपन्न कुटूंबात १२ ऑगस्ट १९१९ ला झाला. त्यांचे वडील, अंबालाल साराभाई राष्ट्रीय वृत्तीचे उद्योगपती होते. त्यांचे बऱ्याच राजकीय व्यक्तिंशी त्यांचे संबध असल्याने रवींद्रनाथ टागोर, जवाहरलाल नेहरू, सरोजिनी नायडू, महात्मा गांधी आदी लोकांचे त्यांच्या घरी जाणे-येणे होते. ते संस्कार विक्रम यांच्यावर बालपणीच झाले.
शालेय शिक्षणानंतर १९३७ साली पुढील शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठात शिकायला गेले. पण दुसरे महायुद्ध सुरु झाल्याने ते भारतात परत आले व त्यांनी बंगलोरमधील इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायन्स मध्ये नोबेल पारितोषिक विजेते सर सी. व्ही. रामन यांच्या मार्गदर्शनाखाली वैश्विक किरणावर संशोधन केले.
१९४२ साली त्यांनी भरतनाट्यम, कुचिपुडी या नृत्यकलेत पारंगत असलेल्या प्रसिद्ध नृत्यांगना मृणालिनी (साराभाई) जयांच्याशी विवाह केला. त्यांना कार्तिकेय आणि मल्लिका ही दोन अपत्ये झाली.
दुसरे महायुद्ध संपल्यावर विक्रम साराभाई पुन्हा ब्रिटनला गेले. १९४७ साली त्यानी ‘कास्मिक रे इंवेस्टिगेशन इन ट्रापिकल लैटीट्यूड्स’ वर संशोधन करून डॉक्टरेट मिळवली आणि त्याच वर्षी ते मायदेशी परत आले.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते आपले ज्ञान व कल्पकता यांचा उपयोग देशाच्या वैज्ञानिक विकासासाठीही करू लागले.
इस्रो व आयआयएम या सारख्या संस्थांचे प्रमुख म्हणून त्यांचा व्याप सांभाळताना साराभाई महिना केवळ एक रुपया मानधन घेत होते, हे विशेष.
त्यांचे कार्य चालू असतानाच ३० डिसेंबर १९७१ रोजी केरळ राज्यातील कोवालम येथे रात्री झोपेतच ह्रदयविकाराच्या झटक्याने विक्रम साराभाई यांचे निधन झाले.
त्यावेळी ते केवळ ५२ वर्षांचे होते. त्यांच्या अथक व निरपेक्ष देशसेवेला प्रणाम!
डॉ.भारतकुमार राऊत
क्रांतिकारी भावपूर्ण जयभीम-लालसलाम काॕम्रेड विक्रम साराभाई
ReplyDelete