कोरोनावर मात करण्यासाठी दिली अनोखी सलामी; खेर्डीतील विनोद भुरण मित्र मंडळाने रक्तदान शिबिराचे केले होते आयोजन
ओंकार रेळेकर-चिपळूण
यावर्षी दहीहंडी उत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने या वर्षी चिपळुणात दहीहंडी उत्सव तितकासा साजरा झाला नाही. मात्र, खेर्डी येथील विनोद भुरण मित्र मंडळाने रक्तदान शिबीर आयोजित करून हा उत्सव आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करून सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. दरवर्षी दहीहंडी उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो. तर खेर्डी येथील विनोद भुरण मित्र मंडळ पुरस्कृत जय हनुमान गोविंदा पथक मानवी मनोरे उभारून गोविंदा रसिकांचे लक्ष वेधतो आणि हजारो रुपयांच्या बक्षिसांची लयलूट करतो. तसेच वर्षभरात वृक्ष लागवड, आरोग्य शिबीर असे लोकोपयोगी उपक्रम या मंडळाच्या माध्यमातून राबविले जातात. या वर्षी कोरोनामुळे बरेच उत्सवांवर विरजण पडले आहे. यामध्ये दहीहंडी उत्सवावर देखील विरजण पडले. मात्र, खेर्डी येथील विनोद भुरण मित्र मंडळाने रक्तदान शिबीर आयोजित करून कोरोनाच्या लढाईसाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. तत्पूर्वी या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गोविंदा वेष परिधान करून ग्रामदेवता श्री सुकाई देवीला साकडे घातले. दरवर्षी आम्ही दहीहंडी उत्सव साजरा करतो. मात्र, कोरोनामुळे हा सण साजरा करता येत नसला तरी आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. तरी सर्वांना सुरक्षित ठेव, असे साकडे घातले आणि नंतर विनोद भुरण मित्र मंडळ, पुरस्कृत श्री गोविंदा पथक खेर्डी, जय हनुमान गोविंदा पथक खेर्डी शिगवणवाडी येथील गोविंदानी रक्तदान करून सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष विनोद भुरण यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वजित कुंभार, स्वचंद शिरगावकर, राजेश शिगवण, रुपेश शिगवण, संदेश चिले, विक्रम पंडित, आकाश सकपाळ, मंदार भुरण, सुदेश मोरे, अविष्कार कदम, प्रणय गुजर, सिद्धेश कदम आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.