प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा जिल्ह्यातील मच्छिमार, मत्स्यसंवर्धन लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा
आदित्य दळवी-महाराष्ट्र मिरर टीम
केंद्र शासनाचे राष्ट्रीय मत्स्यिकी विकास मंडळ (एनएफडीबी) यांच्यामार्फत “प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना" राबविण्यात येत आहे. त्यानुसार मत्स्यव्यवसाय पूरक योजनांचा लाभ जिल्हयातील मच्छिमार, मत्स्यसंवर्धक तसेच इतर इच्छुक लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
मत्स्यव्यवसाय विकासाच्या दृष्टीकोनातून राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती पुढीलप्रमाणे आहे---
*मत्स्यसंवर्धन निगडीत योजना :-* गोड्या, निमखारे पाण्यातील मत्स्यसंवर्धनाकरिता मत्स्यबीज, कोळंबी बीज निर्मिती केंद्राची स्थापना (हॅचरी), मत्स्यबीज संगोपन तलाव, मत्स्यसंवर्धन तलाव बांधणी, निविष्ठा खर्च, RAS/ बायोफ्लॉक पध्दतीने मत्स्यसंवर्धन, जलाशयात पिंजरा पध्दतीने मत्स्यसंवर्धन.
*सागरी मत्स्यसंवर्धन निगडीत योजना :-* सागरी मत्स्यव्यवसाय बाबत सागरी माशांचे मत्स्यबीज केंद्र निर्मिती, मत्स्यबीज संगोपन केंद्र (नर्सरी), खुल्या समुद्रातील पिंजरा पध्दतीने मत्स्यसंवर्धन, समुद्री शेवाळ संवर्धन, शिंपले संवर्धन.
*शोभिवंत मासे निगडीत योजनाः-* शोभिवंत मासे संवर्धन केंद्र (सागरी/गोडेपाणी), ब्रुड बँक, मनोरंजनात्मक मत्स्यव्यवसाय.
*मासेमारी पश्चात व्यवस्थापन निगडीत योजना :-* शीतगृह, बर्फ कारखाना स्थापना, त्याचे आधुनिकीकरण, वातानुकुलित वाहन, इन्सुलेटेड वाहन, मोटारसायकलसह शीतपेटी, सायकलसह शीतपेटी, मत्स्यखाद्य कारखाना.
*बाजारपेठ आणि विपणन मूलभूत योजना :-* किरकोळ मासळी विक्री केंद्र, मासळी विक्री तसेच शोभिवंत माशांकरिता किऑस्क, मासळी मूल्यवर्धित उपक्रमांकरिता संच खरेदी.
*खोल समुद्रातील मासेमारी विकासः-* पारंपारिक मच्छिमारांना खोल समुद्रातील मासेमारी नौका खरेदी, सध्याच्या नौकांमध्ये अपग्रेडेशन/सुधारणा, यांत्रिकी मासेमारी नौकांमध्ये जैव-शौचालयांची स्थापना. *जलचर आरोग्य व्यवस्थापनः-* रोग निदान आणि गुणवत्ता चाचणी प्रयोगशाळेची स्थापना, फिरती प्रयोगशाळा/ क्लिनिक. *मच्छिमारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने :-* पारंपारिक आणि मोटारयुक्त जहाजासाठी संप्रेषण (VHF/DAT/ NAVIC/ Transponders) खरेदी, मासेमारीवेळी सुरक्षा किट, पारंपारिक मच्छिमारांना नौका (बदली) आणि जाळे पुरविणे, मच्छिमारांचा विमा, नौकांकरिता विमा.
*अर्थसहाय्याचे स्वरूपः* सर्वसाधारण लाभार्थींना 40 टक्के अनुदान, अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/महिला/महिलांच्या सहकारी संस्था 60 टक्के अनुदान व उर्वरित लाभार्थी हिस्सा.
*योजना अंमलबजावणी पद्धतः* संपूर्ण योजनेची कार्यवाही मत्स्यव्यवसाय विभागाकडून करण्यात येईल.
तरी जिल्ह्यातील इच्छुक मच्छीमार, मत्स्यसंवर्धन लाभार्थ्यांनी या योजनांच्या अधिक माहितीसाठी सुरेश भारती, मो.क्र.8888883570, सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय विभाग,तिसरा मजला,श्री सिद्धी अपार्टमेंट, डॉ. पुष्पलता शिंदे हॉस्पिटलच्या समोर, अलिबाग पेण रोड, ( दूरध्वनी क्रमांक- 02141- 224221) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी अभयसिंह शिंदे-इनामदार यांनी केले आहे.