साताऱ्यात कोविड सेंटर उभे करण्याची केली मागणी; राज्य सरकारही सकारात्मक-आ.शशिकांत शिंदे .
महाराष्ट्र मिरर टीम- सातारा
(छाया -कुलदीप मोहिते)
सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णाची संख्या वाढत चा लली असून ही गंभीर बाब आहे. जिल्ह्यात आता साडेचार हजाराच्या पुढे रुग्ण गेले असून दररोज हा आकडा वाढत आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्ह्यात नवीन सुसज्ज असे कोविड सेंटर उभे होणे अत्यावश्यक बनले आहे. सातारा जिल्हा प्रशासनाने यासाठी तत्काळ अत्याधुनिक असे नवीन कोविड सेंटर उभे करावे, अशी मागणी मी जिल्हाधिकारी शेखर सिंग यांच्याकडे केली आहे. आपण फक्त पुढाकार घ्या; यासाठी शासकीय पातळीवरून लागेल ती मदत, राज्य सरकारकडील परवानगी आणि आर्थिक सहकार्य मिळवून देवू, असा शब्दही यावेळी जिल्हाधिकारी सिंग यांना दिला.
जिल्हाधिकारी शेखर सिंग यांच्याशी सातारा जिल्ह्यातील वाढते कोरोनाबाधित, कोरोनामुळे होणारे मृत्यू आदी विषयांवर चर्चा केली. त्यावेळी त्यांनी ही मागणी केली. दरम्यान, सातारा जिल्ह्यात कोविड सेंटर उभारणीच्या अनुषंगाने सातारा एमआयडीसीमधील गोदाम उपलब्ध करून देण्याची तयारी असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांकडे आर्थिक तरतुदींसाठी पाठपुरावा करणार आहे.
'सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण जिल्हा रुग्णालयात कोविड सेंटर उभे झाले असले तरी आजमितीस रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेता ते पुरेसे नाही. जिल्हा रुग्णालयात अन्य आजारावरील रुग्ण येत असतात. त्या लोकांना वेळेत उपचार मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे येथील आरोग्य व्यवस्थेवर ताण पडत आहे. यासाठी सातारा जिल्ह्यात आणखी एक सुसज्ज असे कोविड सेंटर उभे करणे आवश्यक बनले आहे. कोरोनाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यांनीही कोविड सेंटर उभारणीच्या अनुषंगाने सकारात्मक्ता दर्शविली आहे. त्यामुळे निधीचीही काही अडचण नाही.'
सातारा एमआयडीसीमध्ये वखार महामंडळाची अनेक गोदामे आहेत. वीज, पाणी त्याचबरोबर अन्य सुविधा तिथे उपलब्ध आहेत. फक्त आरोग्य सुविधाच उपलब्ध कराव्या लागणार आहेत. त्यावरही चर्चा झाली आहे. त्यामुळे कोविड सेंटर उभारणीसाठी जागा आणि इमारत उभारणी हा विषय तत्काळ मार्गी लागणार आहे.
सातारा जिल्हा कोरोनामुक्त झाला पाहिजे..
सातारा जिल्हा कोरोनामुक्त झाला पाहिजे, यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमच्या पक्षाचे सर्व आमदार एकदिलाने कार्यरत आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघ आणि गावागावात आमदार, जिल्हा परिषद सदस्य, सभापती, पंचायत समिती सदस्य, सरपंच गावोगावी कोरोना पासून बचाव व्हावा आणि प्रत्येकाने आरोग्याची काळजी घ्यावी म्हणून सॅनिटायजर, मास्क, आर्सेनिक गोळ्या वाटप करत आहेत. लोकांचे आरोग्य चांगले राहिले पाहिजे आणि लोकांना आधार मिळाला पाहिजे म्हणून सतत मार्गदर्शन केले जात आहे.