बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक ब्लॅक व्हाईट च्या नादात 1 कोटी 27 लाखांचा गंडा
कुलदीप मोहिते- सातारा
ब्लॅक मनी व्हाईट करून देतो असा बहाणा करून सातारा येथील बांधकाम व्यावसायिक सचिन घनश्याम वाळवेकर यांना १. कोटी २७ लाख रुपयांना गंडा घातल्याच्या घटनेने बिल्डर लॉबीमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सातारा शहर पो लीस ठाण्यात १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र कसलाही आगापिछा नसलेल्या संशयितांना पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.
सचिन वाळवेकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार मार्च २०१८ पासून १५ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत सोलेमन, सिसो, पोटलाकोथबाने, एडवरर्थ स्मिथ, बेसन्स, जॉर्ज, मॉरिस, योयोबो ईगरे, माँरिस गोल्डबन, मॉर्गन, सँम, अल्फेड, डॅनियल (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) या संशयित आरोपींनी तक्रारदार यांना बांधकाम व्यवसायात गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यानंतर तक्रारदार यांनी लावलेले पैसे व्हाईट करून देण्यासाठी संशयितांनी तक्रारदाराकडून १ कोटी २७ लाख ४६ हजार रुपये वेळोवेळी घेतले. मात्र त्यानंतर तक्रारदार वाळवेकर यांना व्हाईट मनी देण्यात आला नाही. त्यामुळे त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे वाळवेकर यांनी अखेर सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी १३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील अधिक तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख करत आहेत.