पुणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात 22 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर या कालावधीमध्ये मनाई आदेश जारी
तरोनिश मेहता-पुणे
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणुमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार म्हणून घोषित केला आहे. तसेच कोरोना विषाणुचा प्रसार भारतात, महाराष्ट्रात, पुणे शहरात गतीने पसरत आहे असे दिसुन येत आहे. तसेच राज्य शासनाने कोरोना विषाणु ( कोविड -19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथीचा रोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 13 मार्च 2020 पासुन लागु करुन खंड 2,3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमित केली आहे. त्याबाबतची नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून पोलीस आयुक्तालय क्षेत्रात यापुर्वी वाहनांचा वापर व वाहतुक बंदी, जमावबंदी, सर्व धर्माची प्रार्थनास्थळे बंद ठेवणे तसेच संचारास मनाई करणारे आदेश लागू केलेले आहेत.
पुणे शहरात जनतेच्या मागण्यांसाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना मोर्चे, धरणे, निदर्शने, बंद पुकारणे व उपोषणासारखे आंदोलनाचे आयोजन करतात. शहर परिसरात ठिक – ठिकाणी महानगरपालिकांच्या वतीने अनधिकृत बांधकाम हटविण्याच्या कार्यवाहीच्या वेळेस कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा संभव आहे. 2 ऑक्टोबर 2020 रोजी बाल सुरक्षा दिन, महात्मा गांधी जयंती व लालबहादुर शास्त्री जयंती आहे. त्यानिमित्त पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्र पोलीस अधिनियम, सन 1951 चे कलम 37 (1) (3) व (4) मनाई आदेशानुसार पुणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात 22 सप्टेंबर 2020 रोजी 00.01 वा.पासून ते 5 ऑक्टोबर 2020 रोजी 24.00 वा.पर्यंत 14 दिवसांसाठी कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ, ज्वलनशील द्रव पदार्थ बरोबर नेणे, दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे, सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे, शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठया, बंदुका व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तु बरोबर नेणे, कोणत्याही इसमाचे चित्राचे, प्रतिकात्मक, प्रेताचे, पुढाऱ्यांच्या चित्राचे, प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे. मोठयाने अर्वाच्च घोषणा देणे, वाद्ये वाजविणे, यामुळे सभ्यता अगर नितिमत्ता यास धोका पोहचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे किंवा आविर्भाव करणे, कोणतेही जिन्न्स तयार करुन त्याचा जनतेत प्रसार करणे या कृत्यावर बंदी घालीत आहे, वरील परिसरात कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल अशा पध्दतीने महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 च्या कलम 37 (1) (3) व (4) विरुध्द वर्तन करणे याकरीता मनाई करण्यात आली आहे.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 च्या कलम 37 चे पोटकलम (3) अन्वये 65 वर्षावरील सर्व व्यक्ती, अति जोखमीचे आजार (मधुमेह, उच्च रक्तदाब, दमा,यकृत व मूत्रपिंडाचे आजार, कर्करोग, एचआयव्ही बाधीत रुग्ण इ.) असलेल्या व्यक्ती,गरोदर महिला, वय वर्षे 10 पेक्षा कमी वयोगटातील मुले यांना व इतर कोणत्याही व्यक्तीस अनावश्यक वैद्यकीय कारणाशिवाय सार्वजनिक रस्त्यांवर, गल्लीमध्ये येण्यास, घराबाहेर पडण्यास व जमावाचे कारण होण्यास तसेच पोलीस आयुक्त, पुणे शहर यांच्या पुर्व परवानगी शिवाय सभा घेण्यास, मिरवणुका काढण्यास अथवा गर्दीचे निमित्त होण्यास बंदी घालण्यात आली आहे.
कोरोना विषाणुचा प्रसार रोखण्यासाठीचा भाग म्हणून लॉकडाऊन 5 चे अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या आदेशनानुसार (संदर्भ क्र. DMU/2020/C.R.92/DisM-1 दि.29 जून 2020 ) संपुर्ण राज्यात 30 सप्टेंबर 2020 पर्यंत लॉकडाऊनची कालमर्यादा वाढवण्याची अधिसुचना जारी करण्यात आली आहे. त्यातील सर्व नियम, अटी, शर्ती व तरतुदी या आदेशास लागु राहतील. तसेच या आदेशाच्याअनुषंगाने नव्याने शासनाकडुन व शासकीय यंत्रणांकडुन लागु होणारे आदेश व त्यातील तरतुदीही लागु राहतील, तसेच या आदेशाचे पालन करणे पुणे शहरातील नागरिकांना बंधनकारक राहील, हे संपूर्ण आदेश शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपुर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे त्यांना लागू होणार नाही, या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधीत व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 135 प्रमाणे शिक्षेस पात्र होईल असे पुणे शहर पोलीस सह- आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी कळविले आहे.