आ.भास्कर जाधव यांच्या सूचनेनंतर
लोटेतील कर्मचाऱ्यांसाठी चिपळूण आगारातून बसेस सुरू
ओंकार रेळेकर-चिपळूण
गुहागर मतदारसंघात येणाऱ्या लोटे औदयोगिक वसाहतीतील कर्मऱ्यांना गेल्या काही दिवसांपासून भेडसावणारा प्रश्न आमदार भास्करराव जाधव यांच्यामुळे सुटला आहे. त्यांनी केलेल्या सूचनेनंतर चिपळूण आगाराने चिपळूण-शेल्डी आणि चिपळूण-नोसिल या बसेस सुरू केल्या आहेत. कंपन्यांच्या तीन पाळयांनुसार या गाडयांच्या फेऱ्या धावणार आहेत.
लाॅकडाऊन उठविण्यात आल्यानंतर राज्यात सर्वत्र उदयोगव्यवसाय, कारखाने सुरू करण्यास तसेच त्यानंतर काही दिवसांनी प्रमुख मार्गांवर एस.टी.च्या गाडयाही सोडण्यास सरकारने परवानगी आली. त्यानुसार लोटे औदयोगिक वसाहतीतील कारखानेही सुरू झाले. परंतु, चिपळूण किंवा शेल्डी, गुणदे व परिसरातील कर्मचारी व कामगारांना कंपनीत पोहोचण्यासाठी एस.टी. नसल्याने त्यांची फार मोठी गैरसोय होत होती.
या भागातील अनेक कर्मचाऱ्यांनी ही बाब मतदारसंघाचे आमदार भास्करराव जाधव यांच्या लक्षात आणून दिली. त्यांनी तात्काळ चिपळूण आगार व्यवस्थापक रणजीत राजेशिर्के यांना कंपन्यांच्या पाळयांनुसार एस.टी. गाडया सुरू करण्याची सूचना केली.रणजित राजेषिर्के यांनीही त्यांच्या सूचनेची दखल घेवून लगेचच बसेस सोडण्याचा निर्णय घेतला. या दोन्ही गाडया सुरू करण्यात आल्या असल्याचे त्यांनी आमदार जाधव यांना पत्राद्वारे कळविले आहे. गाड्या सुरु झाल्यामुळे चिपळूण तसेच शेल्डी व परिसरातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांनी आमदार जाधव यांचे आभार मानले आहेत.