आ.शिवेंद्रसिंहराजेंचे पुष्कर कोव्हीड केअर सेंटर उद्यापासून होणार सुरु
सिव्हीलची वैद्यकीय यंत्रणा उपलब्ध होत नसल्याने मंगलमुर्तीकडे केले सुपुर्त
प्रतीक मिसाळ सातारा
सातारा- कोरोना बाधीत रुग्णांच्या सेवेसाठी आ . श्रीमंत छ . शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पुष्कर हॉल येथे ८२ बेडचे कोव्हीड केअर सेंटर उभारले आणि ते जिल्हा प्रशासनाला विनामुल्य हस्तांतरीत करण्यात आले . मात्र जिल्हा रुग्णालय आणि जिल्हा प्रशासनाकडून या सेंटरसाठी डॉक्टर्स , नर्स , वार्डबॉय आदी वैद्यकीय यंत्रणाच उपलब्ध होत नाही . त्यामुळे गेल्या दोन आठवड्यांपासून हे सेंटर बंद होते . कोरोना बाधीतांची संख्या वाढत आहे आणि त्यांना उपचारासाठी बेड मिळत नाहीत . त्यामुळे पुष्कर कोव्हीड केअर सेंटरचा रुग्णांवर उपचार होण्यासाठी उपयोग व्हावा यासाठी आ . शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रशासनाची वाट न पाहता जे कोणी हे सेंटर चालवेल त्याला विनामुल्य सुपुर्त करण्याचा निर्णय घेतला .