अंतिम वर्ष/अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठांना शासन सर्वतोपरी सहकार्य करेल
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
ओंकार रेळेकर-चिपळूण
अंतिम वर्ष /अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठांना शासन सर्वतोपरी सहकार्य करेल असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे संगितले.
आज मुंबई विद्यापीठात परिक्षेसंदर्भातील आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. सामंत बोलत होते.
श्री. सामंत म्हणाले, मुंबई विद्यापीठामध्ये अंतिम वर्षाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या राज्यात सर्वाधिक आहे. परीक्षा घेत असताना परीक्षेच्या प्रक्रियेतून एकही विद्यार्थी सुटता कामा नये, त्यासाठी विद्यापीठ विशेष प्रयत्न करीत आहे. यामध्ये विद्यापीठाकडून सर्व शक्यतांचा अभ्यास करून नियोजन करण्यात आलेले आहे.
तसेच सराव प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून उपलब्ध करून दिली जाणार आहे.
अंतिम वर्षाच्या ज्या विद्यार्थ्यांनी आपला परीक्षा अर्ज भरलेला नाही त्यांच्यासाठी विशेष बाब म्हणून विद्यापीठाने दिनांक १८,१९,२० सप्टेंबर २०२० रोजीचा वाढीव कालावधी दिलेला आहे. या वाढीव तीन दिवसांच्या कालावधीचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा, असेही श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.
श्री.सामंत म्हणाले, मुंबई विद्यापीठांतर्गत परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या २ लाख ४७ हजार ५०० अशी आहे. यामध्ये नियमित परीक्षा देणारे १ लाख ७० हजार विद्यार्थी असून उर्वरित ७२ हजार ५०० हे विद्यार्थी बॅकलॉगचे आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेबाबत कोणतेही संभ्रम करून घेऊ नयेत. विद्यापीठाकडून परीक्षेसंदर्भात वेळोवेळी अधिकृत सूचना विद्यार्थ्यांना देण्यात येतील.
मुंबई विद्यापीठाने आपल्या प्रात्यक्षिक परीक्षा दिनांक १५ सप्टेंबर २०२० पासून सुरू केल्या असून दिनांक २५ सप्टेंबर २०२० पासून बॅकलॉगच्या परीक्षा सुरू होणार आहेत. विद्यापीठाच्या परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात होणार आहेत. यामध्ये ऑनलाईन पद्धतीचा वापर केला जाणार आणि ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा देणे शक्य नसेल अशा विद्यार्थ्यांची ऑफलाईन पद्धतीद्वारे परीक्षा घेण्याचे नियोजन विद्यापीठामार्फत करण्यात आलेले आहे. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असेही श्री. सामंत यांनी सांगितले.
या बैठकीला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, कायदा व सुव्यवस्था सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील,संबंधित अधिकारी उपस्थित होते