चिखलात रुतला मुंबई गोवा महामार्ग
जागोजागी खड्डे आणि चिखलाने वाहनचालक त्रस्त
निलेश पवार-महाड
दोन राज्यांना जोडणाऱ्या मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सन २०१४ पूर्वीपासून सुरु आहे. इंदापूर ते पळस्पे दरम्यान पहिल्या टप्प्यात नवीन आणि जुन्या महामार्गाचे वाटोळे लागल्यानंतर लगेचच इंदापूर ते कशेडी या दुसऱ्या टप्प्याला प्रारंभ झाला. यामध्ये देखील गती येत नसल्याचे दिसून येत आहे. सन २०२० पर्यंत महामार्गाचे काम पूर्ण केले जाईल असे आश्वासन देखील देण्यात आले. मात्र शासकीय परवाने, शेतकऱ्यांचे प्रश्न, मातीची उपलब्धता आदी अडचणींमुळे हे काम रखडले आहे. त्यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून महामार्गाचे काम देखील बंद करण्यात आले. यामुळे ऐन पावसाळ्यापूर्वी केल्या जाणाऱ्या दुरुस्तीचे काम झाले नाही. महामार्गाच्या दुतर्फा केलेला माती भराव, खोदकाम यामुळे जुन्या रस्त्यावर ऐन पावसाळ्यात मातीची चिखल आणि खड्डे तयार झाले. आजही हि दुरुस्ती पूर्ण न झाल्याने रस्त्यावर चिखल आणि खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
जागोजागी निर्माण केलेल्या पर्यायी मार्गावर डांबर शिल्लक राहिला नाही यामुळे पर्यायी मार्गाचा चिखल रस्त्यावर आला आहे. जुना मार्ग आणि पर्यायी मार्गावरील डांबर निघून गेल्याने खड्डे निर्माण झाले आहेत. महाड जवळ दासगाव पासून गांधारपाले, पुढे नातेखिंड ते नांगलवाडी पर्यंत रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. खड्डेमय रस्त्यातून वाहने चालवताना वाहनचालकाला कसरत करावी लागत आहे. खड्ड्यात टाकली जाणाऱ्या पर्यायी भरावाची अवजड वाहनांमुळे वाट लागत आहे. ठेकेदार कंपनीने आपली यंत्रणा या कामाला लावली असली तरी वारंवार होत असलेल्या या खड्ड्यांमुळे त्यांची देखील डोकेदुखी वाढली आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्याचे निर्मुलन यावर शासनाने भर दिल्याने या विकास कामांकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे सर्वसामन्यांना मात्र प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कोकणातून रुग्णांना उपचारासाठी मुंबई किंवा अन्य ठिकाणी जाताना याच महामार्गाचा वापर करावा लागत आहे. मात्र महामार्गाच्या दयनीय अवस्थेने रुग्णवाहिकेचे आणि रुग्णाचे चांगलेच हाल होत आहेत. वेळेवर रुग्ण रुग्णालयात पोहोचत नसल्याने रुग्ण दगावण्याच्या घटना घडल्या आहेत.