नव्वद वर्षांच्या अनुबाई हरपुडे यांनी केली कोरोनावर मात!!
महाराष्ट्र मिरर टीम-कर्जत
कशेळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच जयराम विष्णु हरपुड़े यांच्या मातोश्री आणि कर्जत पंचायत समिति सदस्या सुरेखा अरुण हरपुड़े यांच्या आजेसासु अनुबाई विष्णु हरपुड़े (वय ९०) यांना मागील आठवड्यात बरे वाटत नव्हते.१२ सप्टेंबर रोजी त्याना खोकल्यासह ताप आल्याने ग्रामीण रुग्णालय कशेळे येथे दाखल केले. तेथील डॉक्टरना कोरोना ची लक्षणे असल्याचा संशय आल्याने त्यांची अँटीजन टेस्ट केली. टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना घरीच होम कोरण्टाइन केले. परंतु दोन दिवसानंतर अनुबाईना श्वसनाचा त्रास होउन अस्वस्थ वाटु लागल्याने पुन्हा ग्रामीण रुग्णालय कशेळे येथे अँडमिट केले. तेथील डॉक्टर विक्रांत खंदाड़े यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरु केले. त्यांची ऑक्सीजन पातळी कमी जास्त होत होती. परंतु डॉक्टरांचे प्रयत्न, पूर्वजन्माची पुण्याई आणि दुर्दम्य इच्छाशक्तिने अनुबाई यांनी मृत्युवर मात केली.
कशेळे गावातील सर्वात वयोवृद्ध असणाऱ्या सर्वांच्या अनुआत्या या वयातही कोरोनावर मात करून घरी आल्याने गावातील लोकांना कोरोनावर धैर्याने सामोरे जाण्याचे बळ मिळाले.कोरोना म्हणजे मृत्यु ही भीती कमी झाली.
गुरुवारी अनुआत्याना घरी आणल्यानंतर परिवारातील त्यांच्या नातवंडानी आरती ओवाळून स्वागत केले.