राष्ट्रवादीच्या महिलांनी पंतप्रधान आणि राज्यपालांना पाठवले पोस्टाद्वारे कांदे;तात्काळ कांदा निर्यात बंदी निर्णय मागे घेण्याची केली मागणी...
पुणे सिटी पोस्ट ऑफिस येथे महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी केले आंदोलन...
तरोनिश मेहता -
महाराष्ट्र मिरर टीम पुणे
बळीराजाने पिकविलेला कांदा शेतकऱ्यांच्या लेकी म्हणून आज पुणे सिटी पोस्ट ऑफिस येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यपाल यांना पाठवण्याचे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी केले.
निवेदनाच्या माध्यमातून आणि कांदयाचे पार्सल पाठवून कांदा निर्यात बंदी तात्काळ मागे घ्यावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या महिला काँग्रेसच्या माध्यमातून केली आहे.
आज राज्यभरात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले. केंद्रसरकारला कांदा पाठवून आंदोलनाच्या माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात आला.
जगभरात लाॅकडाऊन असताना, गारपीट, पाणी टंचाई, दुष्काळ, रोगराई या नैसर्गिक आपत्तींना तोंड देत, अनेक आव्हानांचा सामना करीत शेतकरी वर्गाने कांदा उत्पादन घेतले, चार पैसे हातात मिळतील असं वाटत असतानाच लहरी केंद्रसरकारने तातडीने कांदा निर्यात बंदीबाबत निर्णय घेतला.या निर्णयामुळे शेतकरी उध्वस्त झाला आहे.
तर मुंबई जवळील उरण बंदरावर ५ लाख मेट्रिक टन कांदा पडून आहे. जवळपास साडेबाराशे कोटींची उलाढाल थांबली आहे, हा कांदा खराब झाला तर याला जबाबदार कोण? सन्माननीय पंतप्रधानजी, देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी वल्गना करतात, त्याचवेळी शेतकरी विरोधात निर्णय घेतात मग शेतकरी कसा आत्मनिर्भर होणार? असा खोचक सवालही रुपालीताई चाकणकर यांनी केला आहे.
राज्यपालांनी ज्याप्रमाणे महाराष्ट्र पोलिस व महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांना चर्चेसाठी वेळ दिली तशीच वेळ माझ्या कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना द्यावी व त्यांच्या अडचणी केंद्रापर्यंत पोहोचवाव्यात अशी मागणीही रुपालीताई चाकणकर यांनी केली आहे.