लोटे प्राथमिक आरोग्य केंद्रात 'माझे कुटुंब-माझी जबाबदारी' उपक्रमाचा जि. प. अध्यक्ष रोहन बने यांच्या हस्ते शुभारंभ
कोविड योद्धांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव
ओंकार रेळेकर-चिपळूण
कोरोनावर नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने 'माझे कुटुंब माझी जबाबदारी, हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यात १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या दरम्यान आरोग्य कर्मचारी, गावातील दोन स्वयंसेवक असे तिघांचे पथक घरोघरी जाऊन ग्रामस्थांच्या आरोग्याची तपासणी करणार आहे. या उपक्रमाचा मंगळवारी लोटे प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांच्या हस्ते शुभारंभ झाला. यावेळी कोविड योद्धाना सन्मानपत्र देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने म्हणाले की, सध्या लॉकडाऊन नंतर कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. ही बाब लक्षात घेऊन शासनाने कोरोनाच्या विरोधातील लढाई जिंकण्यासाठी शासनाने 'माझे कुटुंब माझी जबाबदरी' हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाला सर्वांनी प्रतिसाद देणे आवश्यक असे स्पष्ट केले. कोरोनाच्या संकटात आरोग्य अधिकारी, कर्मचारी, आशा, अंगणवाडी सेविका, मदतनीस, पोलीस पाटील, रेशन दुकानदार या सर्वांचे काम कौतुकास्पद असून ही लढाई संपेपर्यंत अशीच साथ द्यावी, असे आवाहन केले.
यावेळी जिल्हा नियोजन व जिल्हा परिषद सदस्य अरविंद चव्हाण यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांच्यासह मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी जि. प. शिक्षण समिती सभापती सुनील मोरे, खेड पं. स. उपसभापती जीवन आंब्रे, सदस्य एस. के. आंब्रे, विष्णू आंब्रे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शेळके, गटविकास अधिकारी श्री. धावल, लोटे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ, चेतन कदम, डॉ. संजीवनी टिप्रेसवार, केंद्रप्रमुख बाबाजी शिर्के, संकेत चाळके आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जि. प. सदस्य अरविंद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली लोटे प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी, कर्मचारी, परिचारिका आदींनी मेहनत घेतली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त चंद्रकांत चाळके तर उपस्थितांचे आभार विष्णू आंब्रे यांनी मानले.