भारतमातेची ब्रिटिश कन्या!
डॉ.भारतकुमार राऊत
(लेखक हे राज्यसभेचे माजी सदस्य आणि महाराष्ट्र टाइम्सचे माजी संपादक आहेत)
जन्माने ब्रिटिश असूनही मनाने भारताशी व भारतीय तत्वज्ञानाशी जोडल्या गेलेल्या ॲनी बेझंट यांचा आज १७३ वा जन्मदिन. त्यांच्या स्मृतीस वंदन!
ब्रिटनमध्ये ब्रिटिश कुटुंबात १ ॲाक्टोबर १८४७ रोजी जन्मलेल्या ॲनी बालवयातच भारतीय तत्वज्ञानाकडे ओढल्या गेल्या. शाश्वत सत्याचा मार्ग शोधायचा तर प्राचीन भारतीय तत्वज्ञानाचाच आधार घ्यायला हवा, असे त्या मानीत.
तत्वज्ञानाच्या अतीव ओढीमुळेच त्या १८९३मध्ये भारतात आल्या व भारताच्याच झाल्या. इतक्या की त्यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध भारतात चालू असलेल्या आंदोलनातही भाग घेतला. १९१५ला कलकत्यात भरलेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या त्या अध्यक्ष होत्या.
लोकमान्य टिळकांनी १९१६मध्ये होमरुल चळवळ सुरू केली. तिला देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळू लागला. ॲनीसुद्धा या चळवळीत जोमाने उतरल्या.
हिंदू व बौद्ध तत्वज्ञानाचा ॲनींवर विशेष प्रभाव होता. 'मी जन्माने ख्रिस्ती व मनाने हिंदू आहे', असे त्या म्हणत. आपल्या तत्वज्ञानाच्या प्रसारासाठी त्यांनी 'थिॲासाॅफिकल सोसायटी'ची स्थापना केली. जागतिक थिॲासाॅफिकल संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या.
ज्येष्ठ तत्वज्ञ जे. कृष्णमूर्ती यांचे ॲनींबरोबर जिव्हाळ्याचे संबंध होते. ॲनी त्यांना 'मानसपुत्र' मानीत. कृष्णमूर्ती आपल्या प्रवचनांत वारंवार ॲनींचा 'मदर' असा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करत.
विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात त्यांनी कुटुंब नियोजनाचे महत्व ओळखले होत्या. त्यांनी 'फ्रुट्स ॲाफ फिलाॅसाॅफी' हा याच विषयावर प्रबंध लिहिला. त्यामुळे ख्रिस्ती पुराणमतवादी खवळले. ॲनींना कोर्टात खेचण्याचे आले. ॲनींना सहा महिन्यांची शिक्षा झाली पण वरच्या कोर्टात ती रद्द झाली.
अशा ॲनी बेझंट. २० सप्टेंबर १९३३ रोजी त्यांचे निधन झाले. भारतमातेची ब्रिटिश सुपुत्री निघून गेली.