माजी केंद्रीय मंत्री व जेष्ठ नेते जसवंतसिंह यांचे निधन
माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते जसवंत सिंग यांचे निधन झालं असून विविध स्तरातील मान्यवरांनी त्यांना दुःख व्यक्त करून आदरांजली वाहिली आहे.
जन्म. ३ जानेवारी १९३८ साली राजस्थानच्या राजघराण्यात जन्मलेल्या जसवंतसिंह, उच्च शिक्षणानंतर तेव्हाच्या दरबारी अलिखित प्रथेप्रमाणे सैन्यात अल्पकाल सेवा बजावून परत आले. राजकारणातला त्यांचा ओढा लक्षात घेऊन आधी जनसंघ आणि नंतर भारतीय जनता पक्षाचे राजस्थान मधले धुरंधर नेते भैरोसिंह शेखावत यांनी जसवंतसिंह यांना राजकारणात आणले. मुळात राजघराण्यातील असल्याने जसवंतसिंह यांचे वागणे आणि शालीन तसेच सुखासीनही त्यातच नंतर सैन्यात राहिल्याने जगण्याला शिस्त आलेली. त्यामुळे जसवंतसिंह यांच्या जीवन शैली तसेच सवयीविषयी पक्षात कायम एकाचवेळी असुयापूर्ण आणि नवलाईचीही चर्चा असायची, आजही असते. उच्च शिक्षण आणि वावर परदेशात राहिल्याने जसवंतसिंह झापडबंद नव्हतेच. त्यांचा कल व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनातही कायम सुधारणावादी राहिला. शेखावत यांच्यामुळेच जसवंतसिंह १९८० साली राज्यसभेवर निवडून गेले. पक्ष आणि सत्तेच्या वरिष्ठ वर्तुळात त्यांचा वावर सुरु झाला. अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवानी यांना पक्षाचा प्रवक्ता म्हणून जसा ‘एलिट’ चेहेरा पाहिजे होता तो, जसवंतसिंह यांच्यामुळे मिळाला. पक्षाच्या ‘श्रेष्ठी’ गोटात सहज आणि फारच लवकर त्यांचा समावेश झाला. (आता, लोकसभा निवडणुकीत हवा तो मतदार संघ न मिळाल्याने पक्ष सोडल्यावर भारतीय जनता पक्ष संकुचित दृष्टीचा पक्ष आहे ! अशी टीका करणा-या ) जसवंतसिंह यांच्या वाट्याला केंद्रात अटलबिहारी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तारूढ झाल्यावर परराष्ट्र, अर्थ, सरंक्षण यासारखी महत्वाची खाती आली. केंद्रीय मंत्री म्हणून काम करतानाही त्यांचा सुधारणावादी आणि खुला दृष्टीकोन पाह्यला मिळाला. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या कार्यकाळात घडलेल्या कंदहार विमान अपहरण घटनेत निरपराध प्रवाश्यांचे प्राण वाचावे यासाठी राजकीय विरोध मोडून काढत अतिरेक्यांना सोडण्यात त्यांनी पुढाकार घेतला. ते स्वत: अतिरेक्याना घेऊन कंदहारला गेले आणि अपहरण झालेल्या प्रवाश्यांना घेऊन आले. अमेरिकेशी बिघडलेले संबध पुन्हा सुरळीत करण्यात जसवंतसिंह यांनी परराष्ट्र मंत्री म्हणून बजावलेली भूमिका त्या काळात वाखाणली गेली. म्हणूनच केंद्रातून सत्ता गेली तरी राज्यसभेतील विरोधी पक्ष नेतेपद पक्षाने त्यांच्याकडे सन्मानाने दिले. जसवंत सिंह नियोजन आयोगाचे उपाध्यक्षही होते. त्यांनी मोहम्मद अली जीनांवर २००९ मध्ये लिहिलेल्या पुस्तकाने मोठा वाद निर्माण झाला होता. "जीना- इंडिया, पार्टिशन, इंडिपेंडन्स‘ या पुस्तकात त्यांनी जीना यांचे कौतुक, तर नेहरू-पटेल यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे १९ ऑगस्ट २००९ ला त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर ते पुन्हा पक्षात परतले होते. पण २०१४ मध्ये ते बंड करुन भाजपातून बाहेर पडले.