'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिमेला सहकार्य करा : प्रांताधिकारी
गणेश मते-
महाराष्ट्र मिरर टीम कर्जत
राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधीतांची संख्या वाढतीच आहे. त्यासाठी सरकारच्यावतीने 15 सप्टेंबर रोजी 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या योजनेचा आरंभ करण्यात आला आहे. दरम्यान, कर्जत तालुक्यातील गौरकामथ येथील मोहिमेत प्रांताधिकारी वैशाली परदेशी-ठाकूर यांनी सहभाग घेतला होता. तसेच, या मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. यावेळी, सहाय्यक गटविकास अधिकारी सी. एस. राजपूत, तालुका आरोग्य अधिकारी चंद्रमुनी मोरे, बालविकास प्रकल्प अधिकारी अनिकेत पालकर उपस्थित होते.
राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी ट्रेस, ट्रॅक, ट्रिक या त्रिसूत्रीचा वापर करून कोरोना प्रादुर्भाव रोखण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र, तरीही राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतीच आहे. यासाठी राज्य सरकारच्यावतीने 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार कर्जत उपविभागातील तहसीलदार, गटविकास अधिकारी, आरोग्य अधिकारी यांसह इतर अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन सदर मोहिमेचे नियोजन केले आहे. या मोहिमेंतर्गत शहर, गावे, वाड्या, वस्त्यांवरील नागरिकांची आरोग्य तपासणी, आजार असल्यास उपचार, प्रत्येकाला व्यक्तिशः भेटून आरोग्य शिक्षण देण्यात येत आहे. यासाठी आरोग्य पथके तयार करण्यात आली असून या पथकात स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिलेले दोन स्वयंसेवक आहेत. यामध्ये संशयित कोरोनाबाधित, अतिजोखमीचे ओळखून त्यांची तपासणी आणि उपचार करण्यात येत आहे.
दरम्यान, राज्य सरकारने सुरू केलेली 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' ही मोहीम कर्जत उपविभागातही राबविण्यात येत आहे. यावेळी, या आरोग्य पथकातील व्यक्ती या स्वतःच्या सुरक्षिततेचा विचार न करता नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी घरोघरी फिरत आहेत. त्यांना तपासणीकरीता आवश्यक सहकार्य करण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी वैशाली परदेशी-ठाकूर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
कर्जत उपविभागात कोरोना तपासणीसाठी 6 क्षेत्र
15 ते 25 सप्टेंबर या कालावधीत क्षेत्रानुसार तयार करण्यात आलेल्या पथकांनी कर्जत शहरमध्ये 12 पथकांनी 825 कुटुंबातील 2866 व्यक्तींची तपासणी केली. तर, कर्जत ग्रामीणमध्ये 137 पथकांनी केलेल्या तपासणीत 9530 कुटुंबांमधील 41320 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. माथेरान नगरपरिषदमध्ये 6 पथकांनी 590 कुटुंबांमधील 2387 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. खालापूर ग्रामीणमध्ये 47 पथकांनी 7083 कुटुंबांमधील 28164 कुटुंबांची तपासणी केली. खालापूर नगरपंचायतमध्ये 4 पथकांनी 1108 कुटुंबांमधील 4433 व्यक्तींची तपासणी केली. तसेच, खोपोली नगरपरिषदमध्ये 31 पथकांनी 1240 कुटुंबांमधील 3460 व्यक्तींची तपासणी केली आहे. यावेळी, खालापूर ग्रामीणमध्ये 39 लक्षणे असलेल्या व्यक्ती आढळल्या असून माथेरानमध्ये एक व्यक्ती आढळून आली आहे.