सुप्रिया लाईफ सायन्स कंपनीचे सतीश वाघ कोविड योद्धा म्हणून सन्मानित
ओंकार रेळेकर-चिपळूण
लोटे औद्योगिक वसाहतीमधील सुप्रिया लाइफ सायन्स कंपनीचे मालक सतीश वाघ यांना लोटे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत रुग्ण कल्याण समितीतर्फे कोरोना योद्धा म्हणून नुकतेच जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांनी सन्मानित केले. हा कार्यक्रम जिल्हा नियोजन व जिल्हा परिषद सदस्य अरविंद चव्हाण यांच्या पुढाकाराने घेण्यात आला होता. यावेळी गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त चंद्रकांत चाळके, विष्णू आंब्रे, केंद्रप्रमुख बाबाजी शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते.
कोरणा संकटकाळात सुप्रिया लाइफ सायन्स कंपनीचे मालक सतीश वाघ यांनी पुढाकार घेऊन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अर्थसहाय्य केले याचबरोबर ४२ लाख रुपयांचे सॅनिटायझर व मास्कचा पुरवठा केला. इतकेच नव्हे तर जिल्हा पोलिस प्रशासनाला अर्सनिक अल्बम गोळ्यांचे वाटप करण्यासाठी गोळ्यांचा पुरवठा केला. तसेच लोटे औद्योगिक वसाहतीमधील अन्य उद्योजकांच्या सहकार्याने शासनाला व्हेंटिलेटरचा पुरवठा केला. एकंदरीत कोरोनाच्या संकटात कोविड योद्धा म्हणून सतीश वाघ यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
या कामाची पोच पावती म्हणून लोटे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत रुग्ण कल्याण समितीने सुप्रिया लाइफ सायन्स कंपनीचे सतीश वाघ यांना कोविड योद्धा म्हणून सन्मानित केले. या सन्मानाबद्दल वाघ यांनी कृतज्ञता व्यक्त करीत आपली समाज सेवा अशीच सुरू राहील, अशी ग्वाही उपस्थितांना दिली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने जि. प. सदस्य अरविंद चव्हाण व सतीश वाघ यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीसंदर्भात चर्चा केली. हा कार्यक्रम लोटे प्राथमिक आरोग्य केंद्रात झाला. यावेळी येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त चंद्रकांत चाळके यांनी केले.