खेड पोलिसांचे उत्तम कार्य चोरीला गेलेला ३ लाख रुपयांचा सोन्याचा ऐवज केला परत
महाराष्ट्र मिरर टीम
रत्नागिरी, खेड :
घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करून १०० टक्के चोरीला गेलेला सोन्याचा ऐजव जप्त करून फिर्यादींना परत करण्यात आला. चोरीला गेलेला ३ लाख रुपयांचे दागिने परत मिळाल्याने आनंदी झालेल्या फिर्यादींनी खेड पोलिसांचे आभार मानले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील धामनदेवी गावामध्ये राहणारे इब्राहीम अब्दुल्ला फिरफिरे यांच्या घरातून ३ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरी झाल्याप्रकरणी १६ नोव्हेंबर २०१९ रोजी खेड पोलीस ठाण्यात (गु. र. क्र. २६३/२०१९) भादंवि कलम ४५४, ४५७, ३८० नुसार अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कदम करू लागले. तपासादरम्यान पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कदम व पोलीस पथकाने अजिंक्य मोहिते, दीपक लिल्हारे, सैफ काझी या आरोपींना अटक केली. अटक आरोपीत हे पोलीस कोठडीमध्ये असताना त्यांच्याकडे सखोल तपास केल्यानंतरही गुन्हयात चोरी केलेले सोन्याचे सर्व दागिने कोठे ठेवले आहेत याबाबत आरोपीत काहीही माहिती देत नव्हते.
तपासादरम्यान पोलीस उपनिरीक्षक कदम यांनी सदर गुन्हयाचा शास्त्रीय व तांत्रिक तपास केल्यानंतर आरोपीत यांनी चोरी केल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीमध्ये काही दिवस वास्तव्य केल्याचे निष्पन्न झाले. त्या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक कदम यांनी सदर आरोपीत यांना पुन्हा तपासकामी खेड येथे बोलावून त्यांच्याकडे कसुन तपास केला असता आरोपींनी काही सोन्याचे दागिने डोंबिवली येथील एका सोनाराकडे गहाण ठेवल्याचे व काही सोन्याचे दागिने त्यांच्या एका मित्राकडे ठेवल्याचे सांगितले.
त्या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक कदम हे पोलीस पथकासह डोंबिवली शहरात दाखल झाले. डोंबिवलीतील स्थानिक पोलिसांच्या मदतीने सोनाराचा व आरोपींच्या मित्राचा शोध घेऊ न सोन्याचे एक नेकलेस - ६ तोळे ५.८०० ग्रॅम (६५.८०० ग्रॅम), सोन्याची कानातील कणर्फुले एक जोडी - ८ ग्रॅम वजनाचा, सोन्याची कानातील एक बाळा जोडी - ६ ग्रॅम वजनाची, सोन्याची एक फिंगर रींग ४ ग्रॅम वजनाची, सोन्याची एक फिंगर रींग ३ ग्रॅम आदी ऐवज जप्त केला.
या गुन्ह्याच्या न्यायालयीन खटल्या दरम्यान जप्त केलेले सोन्याचे दागिने फिर्यादी यांना देण्याचे आदेश खेड न्यायालयाने दिले. त्यानुसार खेड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील, पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या हस्ते फिर्यादी यांना चोरीला गेलेला सोन्याचा ऐवज परत करण्यात आला.