भरमसाठ असलेली वीज बिले कमी करा रायगड जिल्हा किसान क्रांती संघटनेची मागणी पालकमंत्री आदिती तटकरेंना दिले निवेदन !
संतोष सुतार-माणगांव
रायगड जिल्ह्यातील जनता कोविड १९ व निसर्ग चक्री वादळाने पुरती हैराण झाली आहे.या संकटात जिल्ह्यातील जनतेला रायगड पाच महिन्यांचे भरमसाठ वीज बिले आल्याने याचा शॉक वीज ग्राहकांनी घेतला आहे.चुकीच्या पद्धतीने देण्यात आलेली ही वीज बिले कमी करून देण्यात यावी .अशी मागणी रायगड जिल्हा किसान क्रांती संघटनेने केली असून तशा आशयाचे जिल्ह्यातील २० हजार वीज
ग्राहकांच्या सह्या असलेले निवेदन रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांना रविवार दि.२० सप्टेंबर रोजी सुतारवाडी येथे संघटनेच्या वतीने संघटनेचे रायगड जिल्हा प्रमुख संतोष पवार,सचिव संतोष शिंदे,खजिनदार विजय कोंडे व सहकाऱ्यांनी दिले.
रायगड जिल्ह्यातील वीज ग्राहकांना पाच महिन्यांचे एकदम बिले आली असून ते देखील चुकीचे व भरमसाठ आल्याने वीजग्राहक पुरते हवालदिल झाले आहेत.या प्रश्नाबाबत रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील १३५ गावांतून तसेच मुरुड,महाड, पाली,कर्जत,खोपोली आदी तालुक्यातील गावांतून सुमारे २० हजार वीज ग्राहकांनी निवेदनावर सह्या करीत हा आपल्यावर अन्याय असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.या निवेदनात संघटनेने म्हटले आहे की,१ एप्रिल २०२० पासून वीज आकार १४ टक्के वाढविण्यात आला आहे. तो ३१ मार्च २०२० पूर्वीचाच विचारात घेतला जावा.वीज युनिट १ ते विज युनिट ३०० पर्यंत स्थित आकार पहिल्या स्लॉटचे दर ३१ मार्च २०२० पूर्वीनुसार अर्थात रुपये ३.०५ मात्र प्रमाणेच आकारण्यात यावे.अतिरिक्त स्थिर आकार कमी करणे जो १ एप्रिल २०२० पासून वाढविण्यात आला आहे.एप्रिल ते ऑगस्ट पर्यंतचे वीज युनिट सम प्रमाणात विभागून विज आकार लावण्यात यावा.वीज बिल भरण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर २०२० आहे.ती वाढवून प्रथम बिल १५ ऑक्टोबर २०२० पर्यंत भरणा तारीख वाढवून देण्यात यावी.मात्र वीज कनेक्शन तोडण्यात येवू नये.अशा विविध मुद्द्यांंचा सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करून उभ्या जगाचा पोशिंदा अर्थात बळीराजाला जीवन जगण्यास पालकमंत्री या नात्याने वीज बिलात कपात करून बळीराजाला स्वाभिमानाने जगण्यासाठी मदत करावी. अशी विनंती पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.सदर निवेदन देताना संघटनेचे माणगाव तालुका उपाध्यक्ष गणेश चाचले,तालुका कार्याध्यक्ष महिपत मांजरे,गोरेगाव विभाग प्रमुख भगवान शिंदे,इंदापूर विभाग प्रमुख रमेश शेडगे, मुगवली विभाग प्रमुख सुरेश म्हस्के,साई विभाग प्रमुख भास्कर गावडे, लोणशी विभाग प्रमुख बाबू पालकर,तालुका सल्लागार रघुनाथ गोसावी, आमडोशी विभाग प्रमुख बाबुराव नासकर, खरवली विभाग प्रमुख बापू बक्कम यांच्यासह जिल्ह्यातून विविध तालुक्यातून संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.