तालुकास्तरावर कोरोना रुग्णालय उभारण्याची गरज विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर
कुलदीप मोहिते -कराड
साताऱ्यातील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील रुग्णांची वाढती संख्या कमी करण्यासाठी तालुकास्तरावरील रुग्णालयांची क्षमता वाढविणे गरजेचे असून त्यावर जिल्हा प्रशासनाने काम करावे, अशा सूचना विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज केल्या.
यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार दिपक चव्हाण, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत आदी उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यात कोरोनाचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे ऑक्सिजन बेडची कमतरता भासत आहे. अशाप्रसंगी क्रांतीसिंह नाना पाटील सार्वजनिक रुग्णालयात ऑक्सिजन बेडची सोय असल्यामुळे येथेच मोठा ताण पडतो. त्यासाठी तालुक्यातील रुग्णालये आणि ग्रामीण प्राथमिक रुग्णालयांची क्षमता वृध्दींगत करावी, अशा सूचना विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केल्या.
जिल्ह्यात अधिकाधिक ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध करण्याबरोबर विविध खाजगी कंपन्या आणि इतर आस्थापनांकडे असलेले ऑक्सिजन सिलेंडर ताबडतोब प्रशासनाने ताब्यात घ्यावेत, असे आदेश पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी यावेळी दिले. छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात येथील जम्बो रुग्णालय अधिक गतीने काम करुन तात्काळ जिल्हा वासियांच्या सेवेत हे रुग्णालय कार्यरत होईल असे आमचे प्रयत्न असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले .
येत्या काही दिवसात जिल्ह्यात साडेसहाशे ते सातशे बेड निर्माण करण्यात येतील. त्याचे कामही सुरु आहे. जिथे जिथे शक्य आहे तिथे बेड वाढवून ते कसे उपलब्ध करुन देता येतील यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे, असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी यावेळी माहिती दिली. तालुकास्तरावर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातही अधिकाधिक सुविधा निर्माण करण्यासाठी आमचा प्रयत्न असून काही ठिकाणची कामे प्रगतीपथावर असून क्षमता वृध्दीबरोबरच तिथे सुविधा देण्याबाबतही कार्यवाही केली जाईल, अशी माहितीही जिल्हाधिकारी सिंह यांनी दिली.
यावेळी " माझे कुटुंब माझी जबाबदारी " या माहिती पुस्तिकेचेही प्रकाशन करण्यात आले. ही पुस्तिका गावागावात दिली जाणार आहे.
सभापती आणि पालकमंत्र्याकडून जंम्बो हॉस्पीटलची पाहणी
छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात जंम्बो हॉस्पीटलचे काम सुरु आहे. त्या कामाची पाहणी विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे व आ.दिपक चव्हाण, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध आठल्ये यांनी केली .