माणगांव तालुक्यातील शिरवली आराेग्य केंद्राची अवस्था बिकट
कर्मचाऱ्यांसह सुमारे 80 गावांचे नागरिक त्रस्त
संतोष सुतार-माणगांव
रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्यातील निजामपुर विभागातील शिरवली विभाग हा अतिदाट लाेकसंख्या व आदिवासी बहुल लाेकसंख्या असलेला विभाग आहे. यामध्येच शिरवली गांवात असणारे आराेग्य केंद्र हे निसर्ग चक्रीवादळाने नेस्तनाबुत केले आहे. निसर्ग चक्रीवादळ आपत्ती येऊन 3 महीने उलटुन संबधित यंत्रणा या भग्न अवस्था धारण केलेल्या शिरवली आराेग्य केंद्राकडे लक्ष का देत नाही? असा प्रश्न विभागातील नागरिक करताना दिसत आहेत. सरकारी सर्व आराेग्य याेजनांचा लाभ देणारे हे आराेग्य केंद्र 90% काेसळले असताना त्यातच काेराेना महामारीने संपुर्ण जग त्रस्त असताना आराेग्य विषयक सेवा बजावणारी यंत्रणा व जिल्हा परीषद प्रशासन एवढे शांत का? असा प्रश्न देखील या विभागातील लाेकांना पडला आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रावर सुमारे 80 गांवे अवलंबुन आहेत. साळवे ते जिते उंबर्डी ते काेंडेथर म्हणजेच रायगड सिमा टाेकापर्यतची गांवे याच आराेग्य केंद्रावर अवलंबुन आहेत.
या आराेग्य केंद्रावरील छप्पर उडाले आहे. येथील कर्मचाऱ्यांनी तात्पुरते बांबु व ताडपत्री टाकुन आधार दिला मात्र पावसापुढे ते काही टिकले नाही. त्यातच मेडीकल ऑफिसर केबिन उघडी,माेडकळीस आलेला पंखा अश्यातच सुमारे 200 पेशंट राेज तपासणी साठी येत आहेत. जिल्हा परिषद या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे लक्ष देणार की नाही याकडे सर्वांचेच लक्ष वेधले आहे.