नेरळ वॉर्ड क्र. 5 मध्ये भीषण पाणीटंचाई
नागरिकांचे ग्रामपंचायतीला निवेदन,आंदोलन उभे राहण्याची चिंन्हे
महाराष्ट्र मिरर टीम-नेरळनेरळ ग्रामपंचायत हद्दीतील प्रभाग क्र. 5 मधील नागरिकांना गेल्या महिनाभरापासून भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. येथील हौसिंग सोसायट्यांना एक दिवसाआड टँकर मागवावा लागत असून पिण्यासाठी बाटलीबंद पाणी विकत आणावे लागत आहे. याप्रश्नी ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना ब्राह्मण आळी विभाग प्रमुख योगेश साठे यांनी नागरिकांच्या वतीने निवेदन सादर केले.
कुंभार आळी, ब्रांह्मण आळी, राजेंद्रगुरू नगर या प्रभाग क्रमांक 5 मधील भागांना महिनाभरापासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. वॉर्डमध्ये ग्रामपंचायतीकडून सकाळी होणारा पाणीपुरवठा अत्यंत कमी दाबाने होत असून संध्याकाळच्या वेळी बर्याचदा अपेक्षित पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे प्रभागात विशेषतः हौसिंग सोसायट्यांमध्ये राहणार्या नागरिकांना भर पावसाळ्यातही पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून पाणीटंचाईची दाहकता आणखी वाढल्याने सोसायट्यांना पदरमोड करून किमान दिवसाआड टँकर मागवावे लागतात तसेच पिण्यासाठी बाटलीबंद पाणी आणावे लागते. गुरूविहार सोसायटीतील महिलांना धारप सभागृह येथील नळावर पाणी भरून दोन ते तीन माळे वर चढवावे लागत आहे. एकूणच प्रभागातील पाणीप्रश्नाबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालय गाठून आपल्या तक्रारी मांडल्या.
यावेळी सरपंच रावजी शिंगवा उपस्थित नसल्याने नागरिकांनी उप सरपंच शंकर घोडविंदे यांची भेट घेऊन समस्यांचा पाढा वाचला. यावेळी उप सरपंच घोडविंदे यांनी येत्या चार दिवसांत प्रभागातील व्हॉल्वची पाहणी करून त्यात जमा झालेला गाळ, कचरा काढून समस्या सोडवण्याचे प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले. ग्रामपंचायत सदस्य संतोष शिंगाडे यांनीही पाणीप्रश्न मिटवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी रमेश गुरव, संजय कांबळे, विनायक रानडे, अशोक कदम, लक्ष्मीकांत मिश्रा, अभिषेक कांबळे, अशोक श्रीखंडे, राहुल मिसाळ, राजेंद्रगुरु नगर माजी विभाग प्रमुख संदीप उतेकर, अमोल म्हसे, गौरव कांबळे, धवल कांबळे, वसंत ढोले, पूजा शिंदे, वैशाली शहा, सौ. गुप्ता आदी नागरिक उपस्थित होते.
पाणी येत नसल्याने आम्हाला धारप सभागृह येथून पाणी बादलीने भरून दोन ते तीन माळे चढून घरापर्यंत न्यावे लागते. - वैशाली शहा, रहिवासी, गुरूविहार हौसिंग सोसायटी
प्रभागातील पाणीप्रश्नावर आवाज उठवण्यासाठी संघर्ष समिती स्थापन करून आंदोलन उभारले जाईल. - वसंत ढोले, नागरिक