कोरोनाच्या हद्दपारीसाठी प्रयत्नांची शिकस्त करण्याचे आमदार धानोरकर यांचे आवाहन
राजेंद्र मर्दाने-वरोरा
दिवसेंदिवस कोरोना संक्रमित रुग्णांची वाढती संख्या ही प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब असून कोरोना केंद्रात स्वच्छता व भोजनासंदर्भातील वाढत्या तक्रारीवर त्वरित अंकुश लावणे अत्यावश्यक असल्याने कोरोनाच्या हद्दपारिसाठी सामूहिकरीत्या प्रयत्नांची शिकस्त करण्याचे आवाहन आमदार प्रतिभा धानोरकर यांनी येथे केले. शासकीय विश्रामगृहात आयोजित तालुक्यातील विविध विभागाच्या प्रमुख अधिकारी व जनप्रतिनिधींच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.
धानोरकर म्हणाल्या की, वेळेवर धावपळ करण्याऐवजी वाढत्या रुग्णांसाठी पर्यायी व्यवस्था प्रशासनाकडे असणे आवश्यक आहे. कोरोना केंद्रात तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वर्ग अपुरा असल्याने तो वाढविणे गरजेचे आहे. ट्रामा केअर रुग्णालयात ऑक्सिजन व बेडची व्यवस्था आहे पण वैद्यकीय अधिकारी नाही, ती व्हायला हवी. रुग्णांची संख्या वाढल्यास कंपनीचे गेस्ट हाऊस, कॉलेजची इमारत, मंगल कार्यालय व गरज पडल्यास खासगी रुग्णालये ताब्यात घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
सदर बैठकीत उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ निलेश पांडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ गोवर्धन दुधे, तहसीलदार सचिन गोसावी, गटविकास अधिकारी संजय बोदले, वैद्यकीय अधिकारी डॉ उत्तम पाटील, मुख्याधिकारी सूर्यकांत पीजदूरकर, पंचायत समिती सभापती, उपसभापती व नगरसेवक प्रामुख्याने उपस्थित होते.