कांदा निर्यात बंदी वरून छत्रपती उदयनराजे भोसले यांचा भाजपला घरचा आहेर
कुलदीप मोहिते -कराड
केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने सरकारला दिलेला कांदा निर्यात बंदीचा प्रस्ताव हा कोरोनाच्या संकटकाळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आणखी संकटात नेणारा आहे. बाजारातील कांद्याच्या वाढत्या किंमतीच्या आधारावर केंद्र सरकारने केलेली निर्यात बंदी ही शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारी आहे, अशा शब्दात केंद्रातील भाजप सरकारला 'सातारी बाणा' दाखवत खासदार उदयनराजे भोसले यांनी घरचा आहेर दिला आहे. केंद्र सरकारने हा निर्यात बंदीचा निर्णय तात्काळ मागे घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
कांद्याचे उत्पादन करणारा शेतकरी हा गरीब आहे. कोरोना काळात खरेतर संपूर्ण देशाला सावरण्याचे काम शेतकऱ्यांनी केले आहे. त्यांनी संपूर्ण देशाला अन्नधान्य व भाजीपाल्याची कमतरता भासू दिली नाही. आज जगभरातून कांद्याला मोठी मागणी आहे. अशावेळी निर्यात बंदी केल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. हजारो टन कांदा निर्यातीसाठी पडून आहे. जेव्हा भाव कोसळतात तेव्हा कांदा फेकावा लागतो. पण आज कांद्याला चांगला भाव मिळत असताना असा निर्णय घेण्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान आहे. त्यामुळे सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी त्वरित मागे घ्यावी, असे खासदार उदयनराजे यांनी म्हटले आहे.
या निर्णयाबाबत आपण केंद्रीय वाणीज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा करणार आहोत, असे सांगून, आधीच लॉकडाऊनच्या संकटातून शेतकरी, व्यापारी, वाहतुकदार हे आता कुठे सावरत असताना ही अचानक केलेली निर्यातबंदी त्यांच्यासाठी घातक ठरेल आणि त्यांचे नुकसान होईल याकडे त्यांनी लक्ष वेधले. या निर्यात बंदीमुळे देशाच्या निर्यात धोरणाला जागतिक स्तरावर फटका बसू शकतो, असे खडेबोलही त्यांनी सुनावले