आधुनिक पत्रतपस्वी!
आधुनिक व्यावसायिक मराठी पत्रकारितेचे जनक कोण? या प्रश्नाचे नि:संशय उत्तर 'नानासाहेब परुळेकर' हे आहे. नवसाक्षर वाचकाला डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी केलेली 'व्यावसायिक' पत्रकारिता आजच्या पत्रकारांसाठीसुद्धा कित्ता आहे.
पुण्यात अनाथ विद्यार्थी गृहात राहून माधुकरीवर बालवयात उपजीविका करणाऱ्याने पुढे अमेरिकेत जाऊन कोलंबिया विद्यापीठाची डाॅक्टरेट मिळवलीच, शिवाय भारतात येऊन 'सकाळ' या पहिल्या वाचकाभिमुख वर्तमानपत्राची स्थापना करून ते सर्वाधिक खपाचे मराठी दैनिकही बनवले. ही कर्तबगारी गाजवणाऱ्या डाॅ. नारायण भिकाजी उर्फ नानासाहेब परुळेकर यांचा आज १२१वा जन्मदिन!
नानासाहेब उच्च शिक्षण घेऊन वृत्तपत्राची निर्मिती करण्याच्या उद्देशाने भारतात परतले, तेव्हा देशात स्वातंत्र्यप्राप्तीचे व समाज सुधारणांचे वारे वाहात होते. साहजिकच सर्व वृत्तपत्रांचे लिखाण त्या दृष्टीनेच होत होते. सामान्य व तळागाळातल्या वाचकाला जे हवे ते त्यास क्वचितच मिळे. अशा वाचकांसाठी नानासाहेबांनी १ जानेवारी १९३२ रोजी 'सकाळ' हे दैनिक काढले.
वृत्तपत्र हे केवळ धर्म वा राजकीय / सामाजिक चळवळीचे साधन नसून तो 'व्यवसाय ' आहे, हे नानासाहेबांचे स्पष्ट मत होते. त्यामुळे 'सकाळ'चे स्वरुपही पहिल्या अंकापासूनच सामान्य वाचकाभिमुख राहिले.
'माझा पेपर मंडईतल्या माणसासाठी आहे. त्याला हव्या त्याच बातम्या व लेख सकाळमध्ये ठळकपणे असणार', असे ते निक्षून सांगत. सोपी भाषा व भवतालचे विषय हे 'सकाळ'चे वैशिष्ट्य होते. तेच त्याच्या यशाचे गमकही.
या वर्तमानपत्राचे नाव काय असावे, यासाठी तज्ज्ञ मंडळींशी चर्चा न करता त्यांनी या शीर्षकासाठी स्पर्धा जाहीर केली व त्यातून 'सकाळ' हे नाव नक्की झाले.
नाना
साहेब भारतात परतले तो काळ राजकीय अस्थिरतेबरोबर आर्थिक मंदीचाही होता. नवीन व्यवसाय सुरू करायला वातावरण अजिबात अनुकूल नव्हते. मात्र अशा परिस्थितीला न जुमानता नानासाहेबांनी जोरदार तयारी सुरू केली. त्यांना मराठीपेक्षा इंग्रजी लिखाणाचा चांगला सराव होता. त्या वेळी मराठी वृत्तपत्रांपेक्षा इंग्रजी वृत्तपत्रांची चलती होती. इंग्रजीला सरकारदरबारीही महत्त्व होते. मराठी दैनिकांची अवस्था फारच बिकट होती. त्यामुळे नानासाहेबांनी जेव्हा आपला मराठी दैनिक सुरू करण्याचा मनोदय बोलून दाखवला, त्या वेळी तात्यासाहेब केळकरांपासून अनेक नामवंतांनी त्यांना त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. नानासाहेब मात्र आपल्या निर्णयावर ठाम होते; कारण स्थानिक भाषेतील वृत्तपत्रांचे महत्त्व त्यांनी परदेशात असतानाच ओळखले होते. समाजातीलग मोठ्या वर्गाशी संवाद साधायचा असेल, तर प्रादेशिक भाषेशिवाय पर्याय नाही याचीही त्यांना जाण होती.
'सकाळ' हे दैनिक व 'स्वराज्य' हे साप्ताहिक पुण्यात यशस्वी केल्यानंतर नानासाहेबांनी मुंबईत 'मुंबई सकाळ' या दैनिकाची स्थापना १२ डिसेंबर १९७० रोजी केली. दुर्दैवाने काही काळातच त्यांची प्रकृती ढासळू लागली व ८ जानेवारी १९७३ रोजी त्यांना देवाज्ञा झाली.
'मुंबई सकाळ'च्या सुरुवातीच्या काळात नानासाहेबांच्या अगदी निकट राहून वृत्तपत्रांत काम करण्याचे धडे त्यांच्याकडून घेता आले, हे माझे परम भाग्य. ते माझे पत्रकारितेतील पहिले गुरू. त्यांच्याबरोबर व्यतीत केलेली दोन वर्षे गुरुकुलातील शिक्षणासारखीच होती. त्यांच्याकडून जे शिकलो, त्याच शिदोरीवर मी आजही जगतो आहे.
या आधुनिक पत्रकारितेच्या शिल्पकाराला आदरांजली.