वावे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या निवास इमारतीची दुरावस्था
वावे आरोग्य केंद्राला जिल्हा ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळावा ग्रामस्थांची मागणी
दोन्ही प्रश्न सोडवण्यासाठी जि. प. सदस्य अरविंद चव्हाण यांनी घेतलाय पुढाकार
ओंकार रेळेकर-खेड
खेड तालुक्यातील वावे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या निवास इमारतींची दुरवस्था झाली आहे. यामुळे येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना भाडेतत्त्वावर खोल्या घेऊन राहावे लागत आहे. या ठिकाणी नव्याने इमारती बांधण्यात याव्यात, अशी मागणी येथील ग्रामस्थ शासन- प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. मात्र, हा प्रश्न अजूनही भिजतच पडला आहे या प्रश्नाची सोडवणूक व्हावी, यासाठी जिल्हा नियोजन व जि प सदस्य अरविंद चव्हाण यांनी पुढाकार घेतला असून ही परिस्थिती जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही उपस्थित ग्रामस्थांना दिली.
खेड तालुक्यातील पंधरागाव विभागासाठी शासनाने सन १९६३ च्या दरम्यान वावे प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती केली. या केंद्रांतर्गत उपकेंद्र असून या माध्यमातून पंधरागाव विभागासह काडवली येथील ग्रामस्थांच्या आरोग्याची तपासणी केली जाते. तसेच शासकीय योजनांची अंमलबजावणी होत असते. मात्र, वावे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या इमारतींची गेल्या काही वर्षांपासून दुरावस्था झाली आहे. यामुळे येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना भाडेतत्त्वावर खोल्या घेऊन राहावे लागत आहे. हा प्रश्न सुटावा, यासाठी येथील ग्रामस्थांमधून सातत्याने शासन-प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. मात्र, अजूनही हा प्रश्न सुटलेला नाही. यामुळे हा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा नियोजन व जि. प. सदस्य अरविंद चव्हाण यांनी पुढाकार घेतला असून ही बाब वावे प्राथमिक आरोग्य केंद्रानंतर्गत 'माझे कुटुंब माझी जबाबदरी या उपक्रमाच्या शुभारंभासाठी आलेल्या रोहन बने यांच्या निदर्शनास आणून दिली. हा विषय सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू असे रोहन बने यांनी सांगितले. तसेच यावेळी ग्रामस्थांनी वावे प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हा ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळावा, अशी मागणी केली. एकंदरीत हे दोन्ही प्रश्न सुटावेत, अशी येथील ग्रामस्थांची मागणी असून शासन प्रशासन दोन्ही प्रश्न कधी सोडवणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.