Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

श्रीवर्धन मध्ये मराठा समाजाचा आरक्षणासाठी एल्गार . श्रीवर्धन तहसील कार्यालयाच्या बाहेर ठिय्या आंदोलन

 श्रीवर्धन मध्ये मराठा समाजाचा आरक्षणासाठी एल्गार .


 श्रीवर्धन तहसील कार्यालयाच्या बाहेर ठिय्या आंदोलन 


 अमोल चांदोरकर-श्रीवर्धन



सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर महाराष्ट्रातील मराठा समाज संतप्त झाला आहे. त्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यातील विविध तहसील कार्यालयांच्या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने शुक्रवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले. श्रीवर्धन तालुक्यातील ग्रामीण व शहरी दोन्ही भागातून निवडक पदाधिकाऱ्यांनी  तहसील कार्यालयाच्या बाहेर ठिय्या  आंदोलन केले. आंदोलन सुरू होण्यापूर्वी  सकल मराठा समाजाच्या वतीने वसंत यादव, सुनील ठाकूर, राजेंद्र भोसले, समीर बनकर, श्रीकांत शेलार  व दत्‍ताराम सुर्वे यांनी समाजा च्या विविध समस्या व मागणी संदर्भाचे निवेदन प्रांताधिकारी अमित शेडगे यांना दिले. सकल मराठा समाजाने दिलेल्या निवेदनामध्ये विविध मागण्या व मराठा समाजाच्या समस्या दिल्या आहेत. त्यामध्ये   समाजाला दिलेले आरक्षण कायम असावे, सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला दिलेली स्थगिती तात्काळ उठवावी समाजाला दिलेले आरक्षण पूर्ववत चालू ठेवावे, कोपर्डी अत्याचार घटनेतील आरोपींना लवकरात लवकर फाशी देण्याच्या दृष्टिकोनातून उच्च न्यायालयात खटला चालवावा, न्यायालयाच्या स्थगिती आदेश येण्यापूर्वी यापूर्वी दिलेल्या आरक्षणानुसार जे शैक्षणिक प्रवेश झालेले आहेत ती  प्रवेश प्रक्रिया खंडित होऊ नये जेणेकरून कुठल्याही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल असे निवेदनात म्हटले आहे. राज्य लोकसेवा आयोगाने मराठा आरक्षणा नुसार संधी दिलेल्या तरुणांना शासन सेवेत सामावून घ्यावे. मराठा व कुणबी समाजाच्या सामाजिक शैक्षणिक आर्थिक मागासलेपणामुळे आरक्षण मागावे लागते ते सामाजिक शैक्षणिक आर्थिक विकासासाठी निर्माण झालेल्या छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था, सारथी संस्था यांना भरपूर आर्थिक निधी व मनुष्यबळ देऊन गतिमान करण्यात यावे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून जास्तीत जास्त  मराठा समाजाला  फायदा होण्याच्या दृष्टिकोनातून आर्थिक तरतूद करण्यात यावी. राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या कामकाजा करता नेमलेल्या समितीच्या कार्यकक्षेत वाढ करावी. यापूर्वी मराठा आंदोलकांवर    दाखल केलेले गुन्हे तात्काळ पाठी घ्यावेत तसेच मुंबई उच्च न्यायालयाने पदोन्नती आरक्षणाबाबत रिट पिटीशन मध्ये दिलेल्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली नाही यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, विद्यमान राज्य सरकारने जाहीर केलेल्या प्रस्तावित पोलीस भरती बाबत आरक्षण स्थगिती  मुळे मराठा तरुणाची संधी जाणार आहे त्या कारणास्तव राज्य सरकारने योग्य निर्णय घ्यावा अशा विविध मागण्यां चा निवेदनात समावेश करण्यात आलेला आहे. सदरचे आंदोलन प्रसंगी वसंत यादव, राजेंद्र भोसले,  समीर बनकर, तेजस ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत मराठा मोर्चा चे स्वरूप बदलताना दिसत आहे. सकल मराठा समाजातील तरुण मोठ्या संख्येने मोर्चात सामील होत आहे. 


 सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती धक्कादायक आहे. त्यामुळे मराठा समाजातील अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. मराठा समाजाने यापूर्वी शांततेत मोर्चे काढलेले आहेत याची सरकारने नोंद घ्यावी... वसंत यादव  (मराठा समाज अध्यक्ष श्रीवर्धन तालुका)


 आमच्या पेक्षा कमी मार्क मिळालेल्या मुलांना चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळते मात्र आम्ही ऍडमिशन पासून वंचित राहतो त्याचे कारण आम्ही मराठा समाजातून आहोत हे आहे. त्यामुळे माझ्या समाजाला सुद्धा आरक्षण मिळाले पाहिजे असे माझे ठाम मत आहे.... तेजस ठाकूर  (विद्यार्थी श्रीवर्धन)



मराठा समाजाला मुख्य प्रवाहात टिकून राहण्यासाठी आरक्षण गरजेचे आहे अन्यथा लवकर मराठा समाज मुख्य प्रवाहामध्ये बाहेर फेकला जाईल. मराठा समाजाला लोकसंख्येचा विचार करतात किमान नोकरी व शिक्षण या दोन्ही बाबींमध्ये आरक्षण मिळालेच पाहिजे. अन्यथा संतप्त मराठा समाज रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही...

राजेंद्र भोसले( श्रीवर्धन)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies