'ययाती'चा कर्ता
तो १९७१-७२चा काळ. मी पत्रकारितेच्या उमेदवारीच्या दशेतच होतो. मुंबई विद्यापीठाच्या भव्य दीक्षान्त सभागृहात कुठल्याशा व्याख्यानमालेत वि. स. खांडेकर यांचे 'मराठी कादंबरी' या विषयावर दोन दिवस व्याख्यान होते. 'सकाळ'चे तेव्हाचे संपादक (कै) ना. भि. परुळेकर यांनी मला त्या व्याख्यानाचे वार्तांकन करायला पाठवले. भाऊसाहेबांची भाषा इतकी रसाळ व वक्तृत्व मंत्रमुग्ध करणारे की भाषणातून टिपणे काढायचे विसरूनच गेलो. रात्री घरी गेल्यावर केवळ आठवणींवर सारे लिहून काढले. तो लांबलचक वृत्तांत भाऊसाहेबांनी वाचून त्याबद्दल एक सुंदर पत्र संपादकांना लिहिले. पत्रकारितेत मला मिळालेली ती पहिली प्रशस्ती!
असे वि. स. खांडेकर. 'जीवनासाठी कला' या सूत्राचा पुरस्कार करीत सातत्याने साहित्य निर्मिती करणारे व मराठीला ज्ञानपीठ पुरस्काराचा प्रथमच मान मिळवून देणारे असे ते ज्येष्ठ साहित्यिक त्यांचा आज स्मृतिदिन. त्यांना अभिवादन !
ज्या काळात 'कलेसाठी कला' की 'जीवनासाठी कला' हा वाद मराठी सुबुद्ध समाजात गाजत होता, त्यावेळी खांडेकरांनी 'जीवनासाठी कला' या सूत्राचा हिरिरीने पुरस्कार केला. त्यावेळी दुसरे लोकप्रिय लेखक ना. सी. फडके यांच्याशी त्यांचे जाहीर वाद झाले. पण खांडेकरांनी 'जीवनवादी' व 'आदर्शवादी' वाङमय निर्मितीचा वसा सोडला नाही.
सकस आदर्शवादी साहित्यसुद्धा तितकेच वाचकप्रिय ठरू शकते, हे त्यांनी आपल्या १६ कादंबऱ्यांच्या लोकप्रियतेने सिद्ध केले.
पांडवांचा पूर्वज ययाती याच्यावर आधारित त्याच नावाच्या कादंबरीमुळे खांडेकरांना ज्ञानपीठ पुरस्कार (१९७४) मिळाला. साहित्यातील सर्वश्रेष्ठ मानल्या जाणाऱ्या या पुरस्काराचे ते पहिलेच मराठी मानकरी. याच कादंबरीला साहित्य अकादमीनेही ( १९६०) गौरवले.
विष्णु सखाराम खांडेकर यांचा जन्म सांगली जिल्ह्यामध्ये १४ जानेवारी १८८९ रोजी झाला. त्यांच्या पूर्वायुष्यात, त्यांना नाटकांमध्ये अभिनय आणि दिग्दर्शन करण्याची आवड होती. त्यांनी काही काळ कोकणात शिक्षकी केली.
खांडेकरांच्या अंतःकरणात ध्येयवाद, समाजकल्याणाची व प्रगतीची तळमळ आहे. लालित्यपूर्ण भाषा, रम्य कल्पना व समाजहिताचा प्रचार ही त्यांच्या लघुकथेची वैशिष्ट्ये आहेत. कल्पनाशक्ती अतिशय तल्लख असल्याने, तेजस्वी लेखनातून मनोरंजन करण्याबरोबर समाजजीवनावर भाष्य करणे हे त्यांच्या लेखनाचे स्वरूप होते.
खांडेकरांनी विपूल लेखन केले. त्यांच्या लेखनातून माणुसकीचा गहिवर दिसून येतो. त्यंच्या लेखनातून माणसावरील अपार श्रद्धा व्यक्त होते.
मराठी साहित्यात रूपककथा हा नवा प्रकार खांडेकरांनी रुढ केला. त्यांनी कादंबरीसह कथा, कविता, लघुनिबंध, समीक्षा, चित्रपट-कथा, नाटक, व्यक्तिचित्रे, अनुवाद अशा विविध साहित्यप्रकारांत लेखन केले. वृत्तपत्रीय लेखन व ग्रंथ-संपादन या क्षेत्रांतही त्यांनी ठसा उमटवला.
खांडेकरांच्या 'उल्का' या कादंबरीवर मराठी चित्रपट निघालाच शिवाय अन्य कथा-कादंबर्यांवर अनेक भाषांमध्ये चित्रपट, दूरदर्शन मालिकाही निर्माण झाल्या. त्यांच्या साहित्याचे अन्य भारतीय व विदेशी भाषांत अनुवाद झाले.
सोलापूरला १९४१ साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने त्यांना डी. लिट. (डॉक्टर ऑफ लिटरेचर) बहला केली. भारत सरकारने त्यांना 'पद्मभूषण' (१९६८) देऊन गौरवले.
तरल शब्दसंपदा लाभलेल्या या जीवनवादी लेखकाची बौद्धिक झेप किती प्रचंड होती, याचे अनोखे दर्शन त्यावेळी झाले. सतत यौवनात राहण्याचा ध्यास घेतलेल्या ययातीने अखेर आपल्या मुलाचे यौवनही लुबाडले. मानवी मनात वास करणाऱ्या श्वापदांवर 'ययाती'च्या निमित्ताने त्यांनी सकस भाष्य केले.
खांडेकरांना १९७६ मध्ये देवाज्ञा झाली. अलिकडच्या काळात मराठीत दुर्मीळ होत चाललेला साहित्यातील आदर्शवाद त्यांच्या रुपानेच दिसत होता.