आदिवासी बेरोजगारांसाठी औषधी वनस्पतीवरील प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
ज्ञानेश्वर बागडे-
महाराष्ट्र मिरर टीम कर्जत
दिवसेंदिवस घटणारे वनक्षेत्र ,पर्यावरणाचे ढासळणारे संतुलन, वनौषधींचे वाढते महत्त्व व बेरोजगारीची समस्या या पार्श्वभूमीवर आदिवासींच्या उत्कर्षासाठी तालुक्याच्या पाथरज प्रभागातील मोरेवाडी येथील सभागृहात "औषधी वनस्पती, लागवड, प्रक्रिया व विपणन " या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. 'महाराष्ट्र आदिवासी वित्त मंडळाचे माजी महाव्यवस्थापक तथा समाजसेवक श्री बाळकृष्ण तिरानकर यांच्या प्रेरणेने शेतकरी व बेरोजगार आदिवासी व्यक्तींसाठी सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणेस्थित पश्चिम विभागीय औषधी वनस्पती व माहिती केंद्र आणि आदिवासी ठाकूर समाज सेवा मंडळ महाराष्ट्र राज्य (रजि.) यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे मार्गदर्शक पश्चिम विभागीय औषधी वनस्पती केंद्राचे प्रमुख डॉ दिगंबर मोकाट , तर अध्यक्षस्थानी प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जतचे विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ रवींद्र मर्दाने हे होते.
व्यासपीठावर आदिवासी ठाकूर समाज सेवा मंडळ महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष मनोहर पादीर, संघटनेचे पदाधिकारी सर्वश्री चाहू सराई, प्रकाश बांगारे, धर्मा निरगुडा, काळूराम वरघडा, परशू दरवडा, जाणू बांगारे, लिंबाजी पिंगळे, गणपत पिंगळे, संजय मोरे, आकाश मिसाळ, पांडुरंग भगत, ए. के. शिद इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
डॉ मोकाट म्हणाले की, जगाच्या २.४ टक्के जमीन व ११.५ टक्के वनस्पती भारतात असून इथे आढळणाऱ्या ४७,००० वनस्पतीपैकी ७,००० वनौषधी म्हणून वापरल्या जातात. वनौषधींमध्ये ५,५०० कोटी रुपयांची उलाढाल देशाने केली असून अजूनही प्रचंड वाव असल्याने आदिवासी बेरोजगार बांधवांनी संधीचे सोने केले पाहिजे. त्यांनी परिसरात आढळणाऱ्या विविध वनौषधींचा नामोल्लेख करीत व उपयोग सांगून वनउपजावर प्रक्रिया केल्यास आर्थिकदृष्ट्या कसे स्वावलंबी होता येते, हे पटवून दिले. प्रधानमंत्री वनधन विकास योजना व केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आयुष अभियानाची माहिती देत बाजारपेठेत मागणी असलेल्या वनौषधींच्या रोपांची निर्मिती, लागवड, प्रक्रिया, वनौषधींच्या बागांची, रोपवाटीकांची निर्मिती यावर त्यांनी मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ मर्दाने म्हणाले की, जल, जमीन व जंगल यावरील आदिवासींचा हक्क पद्धतशीरपणे हिरावला जात आहे. काही भांडवलदारांनी अहोरात्र पाण्याचा उपसा चालविला असून सेझच्या नावाखाली हजारो हेक्टर जागा गिळंकृत केल्यावर आता त्यांचा डोळा जंगलावर आहे. येनकेन प्रकारे जंगल ताब्यात घेण्यासाठी त्यांचा आटापिटा सुरू असल्याने आदिवासींच्या उदरनिर्वाहाचे स्त्रोत हिरावल्या जाण्याचा धोका बळावल्याने सजग होण्याची गरज आहे. ते म्हणाले की, दरवर्षी १४ लाख हेक्टर जंगल नष्ट होत आहे. भारतात गेल्या पाच वर्षात १ लाख २० हजार हेक्टर पेक्षा जास्त जंगल आपण गमावले आहे. देशात ३३ टक्के वनक्षेत्र असणे गरजेचे असताना ते २१.६७ टक्के असल्याचे सांगितलं जातं पण प्रत्यक्षात १८ टक्केच असल्याचं काही तज्ज्ञ नमूद करतात. जैविक विविधतेने संपन्न जगातील १२ व भारतातील दोन विभागात पश्चिम घाट असून त्यात कोकण आहे, असे त्यांनी अभिमानाने नमूद केले. आदिवासी बांधवांनी शासकीय योजनांचा लाभ घेत कंपनी स्थापून डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने शिफारशीत केलेल्या बहुमूल्य वनौषधींची लागवड व उत्पादित वन उपजांवर प्रक्रिया करून विपणन करताना वैदूंच्या ज्ञानाचा फायदा घेत औषधींना ' ब्रँड नेम ' देऊन एकाधिकार निर्माण करावा. आद्य व विश्वासार्हतेमुळे राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर त्या औषधींना चांगली किंमत मिळून आदिवासी बांधव पैसा, पद व प्रतिष्ठा मिळवू शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी वैदू प्रतिनिधी हरी भला , सहाय्यक पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे, एल. जी. पिंगळा व के. के. शिद यांनी मनोगत व्यक्त केले. यानिमित्ताने तालुक्यातील नामवंत वैदू सर्वश्री विठ्ठल पारधी, परशुराम दरवडा, बुधाजी पारधी, पांडू भगत, जाणू बांगारे, हरी भला, जगदीश भला, नवसू आगीवले, धोंडू भगत, काळूराम थोराड, बाळू भगत, चंद्रकांत थोराड, भास्कर भगत, अनंता कडाळी, दसरथ उघडा, कमळू थोराड, चंदर भगत व अर्जुन झुगरे यांचा तसेच १२ वीत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या समीर सीताराम बांगारे या विद्यार्थ्याचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी काही वैदूंनी सोबत आणलेल्या विविध दुर्मिळ औषधी वनस्पती व त्या निरनिराळ्या व्याधींवर रामबाण उपाय म्हणून कशा उपयोगात आणल्या जातात याची इत्यंभूत माहिती डॉ मोकाट यांना दिली. हरी भला या वैदूने बहुगुणी आयुर्वैदिक तेल भेट देताच डॉ मोकाट स्तिमित झाले.
सुरुवातीला मान्यवरांनी थोरपुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले व दीपप्रज्वलन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन मुख्य संयोजक मनोहर पादीर यांनी तर सूत्रसंचालन संजय सावळा यांनी केले. प्रशिक्षणाला आदिवासी युवक-युवतींची लक्षणीय उपस्थिती होती.