भाजपच्या वीजबिल मोर्चाला महावितरणचे असंवेदनशील उत्तर
बिल भरा अन्यथा वीज कापणार , महावितरणचे उप कार्यकारी अभियंता आनंद घुळे यांचा अजब फतवा...
नरेश कोळंबे-कर्जत
कर्जत भाजपच्या किसान मोर्चाचे नेतृत्व करणारे सुनिल गोगटे यांनी 4 जुलै रोजी महावितरणच्या कर्जत ऑफिसला वाढीव बिलांसदर्भात निवेदन दिले होते . त्याचे उत्तर तब्बल दीड महिन्याने महवितरण ने दिले असून आलेली बिले योग्य असून ती न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्यात येईल असा असंवेदनशील इशारा उपकार्यकारी अभियंता आनंद घुले यांनी पत्राद्वारे दिला आहे.
कोरोणाच्या संकटात सर्व जग होरपळून निघत आहे. लोकांच्या नोकऱ्या गेल्या, खाण्यापिण्याचे हाल होत आहेत. नोकऱ्या नसल्याने कुटुंबाच्या गरजा आणि आरोग्याकडे लक्ष द्यायला लोकांकडे पैसे नसताना या कोरोना काळात मात्र महावितरण ने मात्र वेगळाच फायदा घेतला आहे. लोकांना अवाजवी बिल जून जुलै महिन्यात देऊन ते भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लोकांकडे पैसा नसताना आलेले हे वाढीव बिल म्हणजे लोकांसाठी आर्थिक चणचण वाढविणारे आहे . या संबंधी लोकांच्या तक्रारी घेऊन कर्जत भाजप किसान मोर्चाचे महाराष्ट्र सरचिटणीस सुनिल गोगटे यांनी 4 तारखेला कर्जत ऑफिसला भेट देऊन निवेदन दिले होते त्यावर महावितरण चे उपविभागीय अभियंता आनंद घुले यांचे लेखी उत्तर आले आहे. त्यावर ते म्हणाले की एप्रिल, मे महिन्यात विजेचा वापर जास्त होतो तरीही या महिन्यात सरासरीने बिल देण्यात आले आहे . तसेच एप्रिल महिन्यापासून वीजबिल दर वाढले असून देखील त्या दराने वीज बिल न देता जुन्या आकारानुसार ते दिले आहेत. आलेली बिले ही योग्य असून ती सर्वांनी भरावी, अन्यथा वीजपुरवठा खंडित करण्यात येईल, असं असंवेदशील उत्तर कर्जत महावितरण चे उपकार्यकारी अभियंता आनंद घुले यांनी दिले आहे, त्यामुळे जनमानसात असंतोषाचे वातावरण आहे.
ह्याला उत्तर म्हणून भाजपचे किसान मोर्चाचे महाराष्ट्र सरचिटणीस सुनील गोगटे यांनी सर्वांनी बिले विजदरानुसारच भरण्याचे आवाहन केले आहे. व आनंद घुले यांनी दिलेल्या असंवेदशील उत्तरावर आक्षेप घेत आम्ही सुद्धा तोडफोड करून लोकांना वीज बिल न भरण्याचे आवाहन करू शकतो व असहकार आंदोलन चालू करू शकतो , असा इशारा सुनिल गोगटे यांनी महावितरण ला दिला आहे तसेच लोकांच्या अवस्थेकडे पुन्हा एकदा पाहून चांगला निर्णय घ्या असे आवाहन पुन्हा महावितरण विभागाला केला आहे.