मास्क म्हणुन रुमाल बांधून त्याच रुमालाने तोंड पुसणे घातक
संतोष सुतार -माणगांव
माणगांवात क्वारंटाईन शिक्क्याची शाई संपली कोरोना रुग्ण गल्लोगल्ली मोकाट फिरत असल्याचे अनेकजण उघड्या डोळ्यांनी बघतायत, मग प्रशासन करतेय काय? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. संसर्ग रोखण्यासाठी मास्क लावणे महत्वाचे असून हा मस्करीचा विषय झाला आहे. काही लोक तोंडाला रुमाल बांधतात आणि त्याच रुमालाने अधूनमधून तोंडावरचा घाम देखिल पुसतात. मास्कचे नाटक आपल्याच जिवावर बेतेल यामुळे संसर्ग रोखता येईल काय? अजूनही मास्कचे महत्व आणि जनजागृती कमी पडत आहे.
कारवाई होऊ नये म्हणुन दाखविण्या पूरता रूमाल (मास्क) लटकवल्याचे चित्र बाजारपेठेत दिसून येते. काही कोरोना पाॅझिटिव दुकानदार दुकान चालू ठेऊन ग्राहकांना माल देत असल्याची माहिती ऐकावयास मिळत आहे. कोणताही कन्टेनमेण्ट झोनचा फलक याठिकाणी लावलेला दिसत नाही. कोरोनाची नवलाई आता संपली आहे. तेंव्हा कोरोनाची साथ (नवरी) नवीन होती तवा शेवरी वानी लाजत होती. आता कोरोनाची साथ चिलीपिल्ली सारखी पसरली तेंव्हा जनतेवरच कोंबडीवानी आपसात झूंजायची पाळी आली असल्याची गमतीदार प्रतिक्रिया ऐकावयास मिळत आहे.
काही महिन्यांपूर्वी एखाद्याला कोरोना झाला कि लोक त्याच्यासह कुटुंबावर जवळपास बहिष्कार टाकल्या प्रमाणे वागायचे भिती बाळगायचे. आता शेजारात रुग्ण आढळतात लोकही भिती सोडून वागतात. जनजागृती झाल्याने कोरोनाची भिती संपली व हलगर्जीपणा प्रचंड वाढला आहे. अजून धोका संपलेला नाही. नेमकी हिच गोष्ट संसर्गासाठी पोषक ठरुन सर्वांनाच महागात पडणार यासाठीच नागरिकांनी काळजी घ्यावी. प्रशासनाच्या सर्वच प्रांताधिकारी, तहसिलदार, पोलीस, नगरपंचायत मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, लोकप्रतिनीधी यांनी लक्ष वेधावे दुर्लक्ष नको अशी जनतेचीच मागणी आहे.