Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

'...बोले कोयलियाsss!' डॉ.भारतकुमार राऊत यांचा लेख!!

 '...बोले कोयलियाsss!'


डॉ.भारतकुमार राऊत

(लेखक हे राज्यसभेचे माजी सदस्य आणि महाराष्ट्र टाइम्सचे माजी संपादक आहेत)

१९६२च्या चिनी आक्रमणानंतर सारा देश मानसिकदृष्ट्या खचू लागला असताना जनता व जवान यांचे आत्मबळ वाढवण्याच्या उद्देशाने दिल्लीत एका विशाल मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. 



पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू या मेळाव्याला उपस्थित होते. त्यात लता मंगेशकर यांनी व्यासपीठावरून गीत सादर केले. गीताचे बोल लिहिले होते कवी प्रदीप यांनी व संगीत नियोजन सी. रामचंद्र यांचं. त्यांची बोटं हार्मोनियमवर फिरू लागली व त्यातच लताबाईंच्या कंठातून स्वर उमटले, 'ऐ मेरे वतन के लोगो..'



वातवरणात निरव शांतता पसरली...! लताबाई गात होत्या.. कडव्यामागून कडवी जात होती..! गाण्याच्या शेवटाकडे जाताना शब्द होते, 'खुश रहना देश के प्यारों, अब हम तो सफर करते है..!' प्रेक्षकांना हुंदका आवरत नव्हता. लताबाईंनी मागे वळून पाहिले; स्वत: पंडितजी रुमालाने डोळे पुसत होते!


ही जादू प्रदीप यांच्या शब्दकळेची; सी. रामचंद्रांच्या सूरांची व लताबाईंच्या स्वरांची!


भारताच्या कानाकोपऱ्यातील गेल्या तीन पिढ्यांना निश्चितच ठाऊक असलेल्या दहा व्यक्तींमध्ये ज्यांची सहज गणना होईल, अशा स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज ९१ वा वाढदिवस. 



त्यांच्याबद्दल किती लिहावे? कारण कितीही बोललो, लिहिले तरी लतादीदीनी आपल्या सर्वांच्या आयुष्यात ज्या मंद आनंद लहरी निर्माण केल्या, त्याची पुसटशी झलकही त्यातून व्यक्त होणार नाही. मास्टर दीनानाथांची कन्या असलेल्या लतादीदीनी गेली सात दशके अवघ्या भारतीय मनावर अधिराज्य गाजवले.


चाळीसच्या दशकात अभिनेत्रींना 'आवाज' देणाऱ्या दीदी आज त्यांच्या पणतीच्या वयाच्या अभिनेत्रींचाही आवाज बनल्या. हिंदी व मराठीबरोबरच बहुतेक भारतीय भाषांत व अनेक विदेशी भाषांमध्ये त्यांच्या आवाजात गाणी ध्वनिमुद्रीत झाली. सर्वाधिक गाणी रेकाॅर्ड करण्याचा विश्वविक्रमही त्यांच्याच नावावर आहे.


रागदारीबरोबरच सुगम व उडत्या चालीतील गाणी गाताना त्यांनी अनेक नामवंत संगीतकाराबरोबर काम केले व अनेक नवोदितांना नावारुपाला आणले.


हिंदुत्वनिष्ठा व वीर सावरकर यांच्या विचारांच्या भोक्ता असलेल्या लतादीदीनी आपल्या प्रखर राष्ट्रनिष्ठेचा वारंवार प्रत्यय आपल्या वागण्या-बोलण्यातून आणून दिला आहे.


भारत सरकारने लतादीदींना २००१ मध्ये भारतरत्न प्रदान करून जणु 'भारतरत्न'चाच गौरव केला. त्यांना राष्ट्रपतींनी राज्यसभेवर नामनियुक्त केले.


लतादीदींबरोबर अनेक वर्षांचे स्नेहबंध जुळले, हे माझे परम भाग्य. दीदींबरोबर गप्पा मारणे हा स्वर्गीय आनंदाचा अनुभव. तो अनुभव आम्ही अनेकदा घेतला. खाजगी गप्पांमध्ये जुन्या आठवणींबरोबरच अनेक नकला करणाऱ्या व विनोद सांगणाऱ्या दीदींचे ते रुप काही औरच.


२००० साली मटाच्या दिवाळी वार्षिकासाठी लताबाईंवर मीच लिहावे, असे ठरले आणि त्यांची पुण्याच्या त्यांच्या घरी त्यांना भेटलो. बोलतां बोलतां मुलाखत बाजूला राहिली व गप्पा सुरू झाल्या. 



बालपण, कोल्हापूर, पुण्याचा चिमणीचा हौद, त्यांना भेटलेले संगीतकार, त्यांच्या खास लकबी,  बाबा (मास्टर दीनानाथ), भावंडे यांच्या शेकडो आठवणींचा धबधबाच कोसळत होता. त्यात त्या चिंब भिजल्याच शिवाय त्यात मीही न्हाऊन निघालो. 


अर्ध्या तासाची वेळ ठरली होती; चार तास उलटून गेले तरी लताबाई बोलतच होत्या. अखेर काहीसा जड अंत:करणाने पण बराचसा भारावून व आनंदात पुण्याहून ड्राईव्ह करत निघालो. ओठांवर शब्द होते, '..मेरी आवाज ही पेहचान हैं!


लताबाईंना क्रिकेटचा भलताच षौक. लंडनला लाॅर्ड्सच्या जवळच्याच इमारतीत त्यांचा फ्लॅट आहे. १९९६-९७च्या काळात मी लंडन मुक्कामी नोकरीनिमित्त असताना अनेकदा त्यांच्याबरोबर लाॅर्डसवर क्रिकेट पाहायचा योग आला. एका खांद्यावर दुर्बीण, दुसऱ्यावर कॅमेरा, हातात जेवणाचा डबा, पर्स हा भार सांभाळत त्या स्टेडियमवर येत व समोर असेल तो सामना तितक्याच उत्सुकतेने पाहात. नंतर तासभर त्या सामन्यावर त्यांची काॅमेंटरी! सारा दिवस धन्य व्हायचा!



दीदींच्या अनेक आठवणी व शेकडो गाणी आज मनात पिंगा घालतात. त्यातलेच 'सुवर्ण सुंदरी' चित्रपटातील गीत इथे सादर करत आहे.


कुहू-कुहू बोले कोयलिया 
कुञ्ज-कुञ्ज मे भंवरे डोले 
गुण-गुण बोलेन... कुहू... 
सजा सिंगार ऋतू आई बसंती 
जैसे नार कोई हो रसवंती 
सजा सिंगार ऋतू आई बसंती 
जैसे नार हो रसवंती 
डाली-डाली कलियो को तितलिया चूमे 
फूल-फूल पंखादियां खोले, 
अमृत घोले, आ ऽऽऽ
काहे घटा मे बिजुरी चमके 
हो सकता है मेघराज ने बादरिया का 
श्याम-श्याम मुख चूम लिया हो 
चोरी-चोरी मन पंछी उड़े, 
नैना जुड़े आ ऽऽऽ
चन्द्रिका देख छाई, 
पीया, चन्द्रिका देख चाई 
चंदा से मिलके, मन ही मन मुस्काई 
छाई चन्द्रिका देख छायी 
शरद सुहावन, मधु मनभावन 
विरही जानू का सुख सरसावन 
छायी-छायी पूनम की घटा, 
घूंघट हटा आऽऽऽ कुहू-कुहू... 
सारस रात मन भाये प्रीयातामा, 
कमल-कमलिनी मिले 
किरण हार दमके, 
जल मे चांद चमके 
मन सानंद, आनंद डोले रे।


 लताबाई तुम्ही शतायुषी व्हा!

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies