मुंबईचा सिंह!
डॉ.भारतकुमार राऊत
(लेखक हे राज्यसभेचे माजी सदस्य आणि महाराष्ट्र टाइम्सचे माजी संपादक आहेत)
मुंबई महापालिकेचे जनक व भारतीय राष्ट्रीय काॅंग्रेसचे एक संस्थापक सर फिरोजशाह मेहता यांचा आज १०५ वा स्मृतिदिन.
ब्रिटिश सरकारने 'सर' हा मानाचा किताब दिल्यानंतरही सरकारकडून नागरी सुविधा व स्थानिक कायदे करण्याचे अधिकार मिळवण्यासाठी फिरोजशाह झगडत राहिले.
त्यांची बुद्धिमत्ता व कायद्याचे सखोल ज्ञान यांच्या बळावर त्यांनी मुंबई महापालिका कायद्याचा मसुदा लिहिला व तो ब्रिटिश सरकारकडून मंजूरही करून घेतला. त्यानुळेच मुंबई महानगरपालिका अस्तित्वात आली. मुंबई महापालिकेचे ते आयुक्त व अध्यक्षही होते.
त्यांच्या या लढवय्या वृत्तीमुळेच त्यांना 'मुंबईचा सिंह' ही उपाधी मिळाली.
मुंबईतच ४ ॲागस्ट १८४५ रोजी जन्मलेल्या फिरोजशाह यांनी मुंबईत एम ए ची पदवी मिळवल्यावर इंग्लंडमध्ये लिंकन्स ईनमध्ये कायद्याचे शिक्षण घेतले. पण वकिली करतानाच ते समाजसेवाही करत राहिले.
राष्ट्रीय सभेच्या स्थापनेनंतर १८९०मध्ये संघटनेचे अध्यक्षपद त्यांच्याकडे आले. त्यावेळी केलेल्या भाषणात फिरोजशाह यांनी भारतीयांना एकी करून आपले हक्क मिळवण्याचे आवाहन केले.
आपले विचार जनतेपर्यंत व राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी 'बाॅम्बे क्राॅनिकल' हे वृत्तपत्रही चालवले.
सर फिरोजशाह मेहता यांचे मुंबईत आजच्या दिवशी १९१५ मध्ये निधन झाले.
त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून त्यांचा पूर्णाकृती पुतळा आजही मुंबई महापालिकेसमोर उभा आहे. शिवाय संसद भवनाच्या लाॅबीतही त्यांचे तैलचित्र आहे.