मुख्यमंत्री बाबासाहेब-एक अपघात?
डॉ.भारतकुमार राऊत
(लेखक हे राज्यसभेचे माजी सदस्य आणि महाराष्ट्र टाइम्सचे माजी संपादक आहेत)
बॅ. बाबासाहेब भोसले हे खरंच एक अजब रसायन! ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले, हा एक राजकीय अपघात व चमत्कारसुद्धा! स्वपक्षाच्याच आमदारांनी बंड केल्याने त्यांना अपमानास्पदरित्या मुख्यमंत्रीपद सोडावे लागलं. नंतर ताबडतोब पत्रकारांशी बोलताना त्यांची प्रतिक्रिया होती, "माझं मुख्यमंत्रीपद काढून घेतलं. पण माझ्या नावामागं ‘माजी मुख्यमंत्री’ हे बिरुद कायमचं लागलंय. ते कोण काढू शकतो?"
असे केवळ अपघाताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर वर्षभराच्या कारकीर्दीत उपजत विनोदबुद्धीने गाजलेले बॅ. बाबासाहेब भोसले यांचा आज १३वा स्मृतिदिन.
हजरजबाबी वृत्तीमुळे बाबासाहेब कायम हास्याची कारंजी फुलवत राहिले, पण त्या कारंज्यांत त्यांनी अवघ्या वर्षभरात केलेली अनेक मोठी व महत्वाची कामे मात्र वाहून गेली.
मूळचे साताऱ्याचे बाबासाहेब अनंतराव भोंसले बॅरिस्टर झाले व मुंबईत वकिली करू लागले. १९८०च्या निवडणुकीत ते मुंबईतील नेहरू नगर मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले व ए. आर्. अंतुले यांच्या मंत्रीमंडळात कायदा मंत्री झाले. १९८२मध्ये अंतुलेंना सिमेंट भ्रष्टाचार प्रकरणात राजीनामा द्यावा लागल्यानंतर आश्चर्यकारकरित्या इंदिरा गांधींनी बाबासाहेबांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा धक्का केवळ राजकीय वर्तुळाला नव्हे, तर खुद्द बाबासाहेबांनाही बसला होता.
बाबासाहेबांना जेमतेम एक वर्ष दहा दिवसांचेच मुख्यमंत्रीपद लाभले. या काळात काँग्रेसजनांनी त्यांच्याविरुद्ध बंड केले व नागपूरचे अधिवेशनही उधळले. अखेर त्यांना बदलण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला व वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाले.
बाबासाहेबांचा उल्लेख क़ायम त्यांच्या विनोदांबद्दल होत असला तरी इन मिन एक वर्षाच्या कारकीर्दीतच त्यांनी मुलींसाठी दहावीपर्यंतचे शिक्षण मोफत केले, तसेच पंढरपूर मंदिरातील बडव्यांची सद्दीसुद्धा संपवली.
बाबासाहेबांनीच मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ स्थापन करून मराठवाड्यातील जनतेची जुनी मागणी पूर्ण केली. विदर्भात गडचिरोली जिल्ह्याची स्थापनाही त्यांनीच केली.
ते स्वत: स्वातंत्र्यसैनिक होते व १९४२ च्या आंदोलनात त्यांनी दीड वर्षे कारावासही भोगला. त्यामुळेच स्वातंत्र्यसैनिकांसाठी त्यांनी अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या. स्वातंत्र्यसैनिकांसाठी तहहयात पेन्शन चालू करण्याची योजना त्यांचीच.
बाबासाहेब मुख्यमंत्री असतानाच राज्यातील पोलिसांनी संप केला होता. मात्र, पोलिसांची सेवा ही अत्यावश्यक सेवा असल्याचे सांगत पोलिसांचे युनियन मोडून काढले होते.
विलासराव देशमुख, श्रीकांत जिचकार यांना बाबासाहेबांच्या सरकारात पहिल्यांदा संधी मिळाली. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटीलसुद्धा त्यांच्या मंत्रिमंडळात होत्या.
पत्रकारांशी गप्पा मारताना बाबासाहेबांच्या तोंडून विनोदाचे झरे नव्हे, धबधबे वाहात. ते स्वत:ही खळाळून हसत.
त्यांचे चिरंजीव दिलीप भोसले न्यायव्यवस्थेत होते. अलाहाबाद हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून निवृत्त झाल्यावर त्यांची भारताचे उपलोकपाल म्हणून निवड झाली होती.
दिलीप काॅलेजात बीएला माझ्याच वर्गात होता. त्यामुळे त्यांच्या घरी आमचे नेहमी येणेजाणे असायचे. तेव्हा बाबासाहेब त्यांच्या खास शैलीत विनोद करत. मंत्री होईपर्यंत कुर्ला ते बोरिबंदर हा प्रवास खच्चून भरलेल्या लोकल ट्रेनमधून करण्यात त्यांन कधी कमीपणा मानला नाही व मुख्यमंत्रीपदावरून उतरल्यावर मंत्रालयाच्या समोरच्याच टपरीवर भजी व चहा प्यायला ते कधी लाजले नाहीत.
असे बाबासाहेब . अल्पशा आजाराने ६ ॲाक्टोबर २००७रोजी त्यांचे निधन झाले. विनोद व हजरजबबाबी वृत्तीचा अतिरेक झाल्याने या बुद्धिमान व पंडित विचारवंताचे केवळ 'विनोदवीर' इतकेच स्मरण मागे उरले.