सतार ते तुतारी!
डॉ.भारतकुमार राऊत
(लेखक हे राज्यसभेचे माजी सदस्य आणि महाराष्ट्र टाइम्सचे माजी संपादक आहेत)
एक तुतारी द्या मज आणुनि
फुंकिन मी जी स्वप्राणाने
भेदुनि टाकिन सगळी गगनें
दीर्ध जिच्या त्या किंकाळीने
अशी तुतारी द्या मजलागुनी
अशा शब्दांत क्रांतीचा मंत्र पोहोचवतानाच 'सतारीचे स्वर दिड दा दिड दा' असे मधुर गुंजन करणारे आधुनिक मराठी कवितेचे प्रवर्तक कृष्णाजी केशव दामले उर्फ केशवसुत यांचा आज जन्मदिन.
१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात ज्यांच्या रसाळ व गेयबद्ध तरीही साध्या सोप्या शब्दांच्या कवितेने मराठी मनावर गारुड घातले, असे केशवसुत. त्यांना जेमतेम चाळशीचे आयुष्य लाभले. त्यांच्या १४० कविता सध्या उपलब्ध आहेत. मात्र इतक्या प्रतिभावान कवीचा एकही संग्रह त्यांच्या हयातीत प्रकाशित झाला नाही, हे दुर्दैव. त्यांच्या निधनानंतर ह ना आपटे यांनी 'केशवसुतांची कविता' हा संग्रह प्रकाशित केला.
मुळगुंद या निसर्गरम्य गावात जन्मलेले दामले यांचे शिक्षण काही वर्षे पुण्यात लोकमान्य टिळक व आगरकरांच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. त्यामुळे त्यांच्यात राष्ट्रीय बाणा निर्माण झाला. तो त्यांच्या कवितेत उतरला.
त्यांच्या कवितेवर पाश्चिमात्य कवींचाही प्रभाव होता. मराठीबरोबरच संस्कृत व इंग्रजी भाषांमधील त्यांचे वाचन अफाट होते. त्यामुळेच कवितेच्या रचनेची नवी घाटणी त्यांनीच तयार केली. कविता वाचल्यानंतर ती गुणगुणता आली पाहिजे, असा त्यांचा कटाक्ष होता.
नवा शिपाई, झपुर्झा अशा त्यांच्या कविता आजही मुखामुखात आहेत. मनात रेंगाळणाऱ्या त्यांच्या काही कविता मी आज दिवसभरात सादर करणार आहे.
मृत्यूच्या काही काळ आगोदर त्यानी लिहिलेली ही कविता त्यांच्या परिचित लेखन स्वभावापेक्षा वेगळी आहे. हा अभंग ही त्यांची शेवटचीच रचना:
तुझे नाम मुखी ध्यान तुझे डोळा
व्रुत्ती या चंचळा स्थिरावल्या॥
चिंता भय दुःखे अवघी दूर झाली
अनाथांचा वाली जवळी केला॥
भिकार या जगी इच्छित न मिळे काही
म्हणुनी तुझे पायी भिक्षां-देहि॥
केशवसुत म्हणे देवा दीन-नाथा
तुझे पायी माथा वाहियेला॥
असे केशवसुत! त्यांच्या स्फूर्तिदायी पण काव्यात्मक स्मृतींना श्रद्धांजली!