सरला मोहिते मृत्यू प्रकरणातील दोषींवर कारवाई करा माणगावात बेलदार समाज भगिनींची निवेदनाद्वारे मागणी
संतोष सुतार-माणगांव
दगड फोडून उदरनिर्वाह करणाऱ्या बेलदार समाजाच्या सौ.सरला अक्षय मोहिते वय वर्षे २२ रा.देवळफळी, ता.नवापूर, जि.नंदुरबार यांचा नंदुरबार जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला असून हा मृत्यू संशयास्पद असल्याच्या आरोप माणगावमधील बेलदार समाजाच्या महिला तालुकाध्यक्ष दिपाली जाधव यांनी करून याप्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कारवाई करून त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून दोषींना आरोग्य खात्यातून बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे बेलदार समाज भगिनींनी केली आहे.याबाबतचे निवेदन नुकतेच माणगाव तहसीलदार यांना देण्यात आले असून ते निवेदन नायब तहसिलदार बी. वाय. भाबड यांनी स्वीकारले. तसेच माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांनाही सदरचे निवेदन माणगाव तालुका बेलदार महिला समाज संघटनेच्या अध्यक्षा दिपाली जाधव,आशा मोहिते,मीना साळुंखे,संजना चव्हाण,सरिता चव्हाण,राधिका चव्हाण यांनी दिले.
या निवेदनात असे म्हटले आहे की, सौ.सरला मोहिते या अत्यंत हालाखीचे जीवन जगणाऱ्या दगड फोडून उदरनिर्वाह करणाऱ्या बेलदार समाजातील महिला होत्या.त्या आजारी पडल्याने त्यांच्या कुटुंबातील गरिबीमुळे त्यांना खाजगी रुग्णालयात
नेता आले नाही म्हणून त्यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.याठिकाणी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवून त्यांची कोविड चाचणी निगेटिव्ह आली होती.तो अहवाल खरा की खोटा याबद्दल शंका आहे. त्या अहवालाची चौकशी व्हावी.तसेच दि.५ ऑक्टोबर २०२० रोजी त्यांना श्र्वसनाचा त्रास होत असताना व्हेंटिलेटर कोणी काढले,आदेश कोणी दिले. रुग्णवाहिकेतून दोन रुग्ण नेण्यासाठी कोणी सांगितले? सरला मागासवर्गीय दगड फोडणाऱ्या बेलदार समाजातील मुलगी असल्याने जाणीवपूर्वक तिचा ऑक्सीजन काढून तिला तडफडून मारले.हा मृत्यू संशयास्पद असून सदर महिलेच्या पीडित कुटुंबाला सरकारने न्याय द्यावा. अन्यथा नजीकच्याच काळात महाराष्ट्रातील बेलदार समाजातील महिला भगिनी पेटून उठून आंदोलन करतील. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी सरकारची राहील असा इशारा समाजाचे राज्याचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावतीने समाजाच्या माणगाव तालुकाध्यक्ष दिपाली जाधव यांनी दिला आहे.