विना हेलमेट-ट्रीपलसीट दुचाकी चालविणाऱ्यांवर होणार कडक कारवाई : पो. नि. रामदास इंगवले
रविंद्र कुवेसकर -उतेखोल/माणगांव
रायगडचे नवनियुक्त पोलीस अधिक्षक अशोक दुधे यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यामध्ये मोटार अपघातांचे प्रमाण कमी होण्याच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी व मोटार वाहन कायद्याची तंतोतंत अंमलबजावणी करणेचे गरजेचे झाल्याने, तसेच सध्या कोव्हिड-१९ चा प्रादूर्भाव होत असल्याने सुरक्षित अंतर ठेवण्याबाबतही शासनाचे आदेश आहेत. सर्व दुचाकी स्वारांनी हेलमेट वापरावा तसेच ट्रीपलसीट वाहन चालवू नये या बाबत जनजागृती केली जात आहे. तरीही कायद्याचे उलंघन करणाऱ्यांवर मोटार वाहन कायदा कलम १२९/१७७ प्रमाणे वाहतुक पोलीसांचे माध्यमाने कारवाई केली जात आहे. तसेच यापूढेही माणगांव मध्येही विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहीती वरिष्ठ पोलीस निरिक्षक रामदास इंगवले यांनी आज दि. १३ ऑक्टोबर रोजी दूपारी पोलीस ठाणे येथे पत्रकारां सोबत घेतलेल्या सभेत दिली आहे.
त्यामुळे सर्वांनीच दुचाकी वाहने चालविताना हेलमेट वापरणे सक्तीचे आहे. हेलमेट न वापरल्याने बहूतांशी अपघाता मध्ये दुचाकीस्वार हे दुर्दैवाने मृत्युमुखी पडतात. त्यामुळे मयताचे कुटुंबियांवर आघात होऊन कधीही न भरुन येणारे नुकसान झाल्याच्या अनेक घटना घडल्याचे निदर्शनात येत आहे. तसेच दुचाकीस्वार हे अनेकदा ट्रीपलसीट बसून वाहन चालवितात त्यामुळेही अपघाताचे प्रमाणात वाढ दिसून येत असल्याचे निदर्शनात आले आहे. त्यामुळे विना हेलमेट व ट्रीपलसीट वाहन न चालविण्याची स्वतःची जबाबदारी टाळल्यास आता होणार कारवाई ! यासाठी "माझे वाहन मी नियमात चालविणार ही माझी जबाबदारी !" अशा प्रकारचेच काम पोलीसांना अपेक्षित आहे. या साठीच जनजागृती केली जात आहे.