माणगांव तालुक्यातील भातशेती कापणीला सुरुवात , परतीच्या पावसाचे पाणी शेतात तुंबून राहिल्याने कापणीच्या कामात मोठा अडथळा !
संतोष सुतार-माणगांव
माणगांव तालुक्यातील तयार झालेली भातशेती कापणीस सुरुवात झाली आहे.
कोरोनाचे सावट ,निसर्ग वादळाचा तडाखा बसलेल्या शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचाही फटका बसला आहे.ऑक्टोबर च्या सुरुवातीला तालुक्यातील भातशेती कापणीस सुरुवात झाली आहे.परतीच्या पावसाने झोडपलेल्या शेतातून पाणी तुंबून राहिले असल्याने कापणीच्या कामात शेतकऱ्यांना अनंत अडचणी येत आहेत. बरेच दिवस लोम्बि पाण्यात राहिल्याने भाताचे दाणे काळवंडून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. पाण्यात जास्त काळ पेंढी राहिल्याने त्या कुजत असून त्यामुळे पेंढ्याची वैरणही खराब होत आहे.
परतीचा पाऊस अधेमध्ये हजेरी लावत असल्याने शेतकरी थोडी थोडी कापणी करून भातशेतीचे नुकसान टाळत आहेत.भिजलेल्या भाताच्या पेंढी शेतातून बाहेर काडून त्यांना मोकळ्या जागेवर सुकवून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.
कोरोना महामारीमुळे मजुरकर मिळत नसल्याने व मजुरी परवडत नसल्याने शेतकरी कुटुंबातील सदस्यांसह थोडी थोडी कापणी करून लगेचच झोडणी ही करत आहे.मात्र भात पावसात भिजल्याने त्याला विक्रीचा दर अतिशय कमी मिळेल या चिंतेने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
भातशेती कापणीस तयार होत आहे. परतीच्या पावसाने उभे पीक आडवे होत आहे. त्यामुळे कापणी करताना अनंत अडचणी येत आहेत. भिजलेल्या भातांच्या पेंढी पाण्यातून बाहेर काढणे वाळविणे इत्यादी कामे वाढली असल्याने वेळ व मजूरही जास्त लागत आहेत.
सुभाष ढाकवळ,शेतकरी ,माणगांव.
परतीच्या पावसाने शेतीचे नुकसान झाले आहे.लोम्बित आलेला भात झोडपून पडल्याने पळज निर्माण झाली आहे. शेतात पाणी साचून राहिले असून कापणी करताना शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत.भातशेती पूर्ण तयार झाली असून वेळेवर कापणी न झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे.
संदीप खडतर
अध्यक्ष, आत्मा शेतकरी संघटना, माणगांव.