मिनी ट्रेन रुळावर कधी ? पर्यटकांमध्ये प्रचंड उत्सुकता!!
चंद्रकांत सुतार --माथेरान
पर्यटकांचे खास आकर्षण असणारी माथेरानची मिनिट्रेन लवकरच रुळावर यावी अशी उत्सुकता पर्यटकांमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने याबाबत तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी पर्यटकांसह स्थानिकांमधून होत आहे.
लॉक डाऊन काळात देशातील सर्व रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. तर पर्यटनस्थळ असलेल्या माथेरान मध्ये वाहतुकीची सोय नसल्याने तुर्तासतरी इथे जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यासाठी गावात टेंपोला परवानगी द्यावी अशी मागणी काही महिन्यांपूर्वी येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे यांनी जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे केली होती. परंतु त्यावेळी जिल्हाधिकारी यांनी रेल्वेची मालगाडी सुरू केली होती. या ट्रेन मध्ये जीवनावश्यक असणारे गॅस सिलेंडर येऊ शकत नव्हते. त्यावेळी २६ जून ते३० सप्टेंबर या मर्यादित कालावधी साठी टेंपोला परवानगी देण्यात आली होती. तर अन्य जीवनावश्यक साहित्य वाहतूक करण्यासाठी मालगाडी सेवा जिल्हाधिकारी यांच्या सांगण्यावरून रेल्वे प्रशासनाने सुरु केली होती ही सेवा फक्त तीन महिने सुरू होती या ट्रेन मध्ये दस्तुरी नाक्यापासून ते अमन लॉज रेल्वे स्टेशन पर्यंत तीन वेळा सामानाच्या चढउताराची वाहतूक करणे खूपच खर्चिक होते.त्यामुळे ही मालगाडी रिकामीच ये जा करत होती या ठराविक काळात रेल्वेला फक्त १३१० रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले होते.
लॉक डाऊन काळात देशातील सर्व रेल्वे सेवा बंद असताना देखील केवळ माथेरान मधील मालगाडी काहीच उत्पन्न नसताना सुरू होती.याचा अर्थ अधिकारी वर्गापुढे प्रशासन हतबल झालेले दिसत आहे. नुकताच २ सप्टेंबर पासून माथेरान अनलॉक करण्यात आल्यानंतर इथे पर्यटकांची संख्या वाढत आहे दस्तुरी पासून गावात येण्यासाठी फॅमिली ग्रूपला,जेष्ठांना तसेच बालगोपालांना खूपच त्रासदायक आणि खर्चिक ठरत आहे. दरवर्षी पावसाळ्यात चार महिने रेल्वेच्या विश्रांती नंतर १५ ऑक्टोबरला नेरळ माथेरान मिनिट्रेन सेवा पूर्वपदावर यायची परंतु रेल्वे मार्गातील सर्व कामे जवळजवळ पूर्ण झालेली असताना ही सेवा रेल्वे अधिकाऱ्यांची मानसिकता नसल्याने अद्याप सुरू करण्यात आलेली नाही तर या अमन लॉज ते माथेरान दरम्यान शटल सेवा सुध्दा सुरू करण्यात आलेली नाही.आगामी काळात सुट्टयांचा हंगाम सुरू होणार आहे.
दरवर्षी आम्ही सहकुटुंब ऑक्टोबर महिन्यात माथेरानला भेट देत आहोत. परंतु अद्याप मिनिट्रेन सेवा सुरू नसल्याने आमचा पुरता हिरमोड झाला आहे. लॉक डाऊन मध्ये घरात अक्षरशः कंटाळून गेल्यामुळे कधी एकदा इथे जाऊन मनाला शांती मिळते का याच प्रतीक्षेत होतो. तरी शटल सेवा उपलब्ध करून द्यावी.दस्तुरी वरून गावात येताना खूपच खर्च केवळ वाहतुकीसाठी होत असतो जेणेकरून आमच्या बालगोपालांना याची मजा घेता येईल यासाठी ट्रेन सुरू करावी.
नवनीत सारंगे -- पर्यटक मुंबई