... आणि बर्लिनची भिंत कोसळली!
डॉ.भारतकुमार राऊत
(लेखक हे राज्यसभेचे माजी सदस्य आणि महाराष्ट्र टाइम्सचे माजी संपादक आहेत)
कम्युनिस्ट राजवट असलेली पूर्व जर्मनी व भांडवलदारी लोकशाही मानणारी पश्चिम जर्मनी यांना विभागणारी पश्चिम जर्मनी यांना एकमेकांपासून कृत्रिमरित्या तोडणाऱी बर्लिनची कुप्रसिद्ध भिंत १९९०मध्ये पूर्णपणे तुटली व आपापल्या नावांपूर्वीचे पूर्व व पश्चिम हे विशेषण पुसून टाकून जर्मनी पूर्ववत् एकसंध झाली.
म्हणूनच आज 'जर्मन ऐक्य दिन' मोठ्या आनंदात साजरा होतो. यानिमित्त समस्त जर्मन नागरिकांचे अभिनंदन!
दुसऱ्या महायुद्धात हिटलरच्या नाझी राजवटीचा पाडाव झाल्यानंतर जर्मनीत ज्या राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक उलथापालथी झाल्या, त्यातच हे राष्ट्र दुभंगले. कम्युनिस्ट प्रभाव असलेली पूर्व जर्मनी व संसदीय लोकशाही मानणारी पश्चिम जर्मनी यांनी काडीमोड घेऊन स्वतंत्र राष्ट्रे स्थापन केली.
जर्मन डेमोक्रॅटिक रिपब्लिक (जीडीआर) व फेडरल रिपब्लिक ॲाफ जर्मनी अशी दोन राष्ट्रे उदयाला आली. बर्लिन शहर दोन्ही नवनिर्मित देशांच्या सीमेवर होते.
या दुभाजनादरम्यान नाझी जर्मनीची राजधानी बर्लिनचे देखील पूर्व बर्लिन व पश्चिम बर्लिन असे दोन भाग करण्यात आले. पूर्व जर्मनीमधील कम्युनिस्ट राजवटीने १९६१ साली पश्चिम बर्लिनला पुर्णपणे वेढून टाकणारी ही भिंत बांधली. पूर्व जर्मनीमधुन होणारे जर्मन नागरिकांचे पलायन थांबवणे हा ह्या भिंतीचा मुख्य उद्देश होता.
या काँक्रिटच्या मज़बूत भिंतीवर तारा बांधलेल्या होत्या व कडेकोट पोलिस बंदोबस्तही होता. बर्लिनची भिंत बांधण्यापुर्वी १९४५ ते १९६१ दरम्यान अंदाजे ३५ लाख पूर्व जर्मन नागरिकांनी पश्चिम जर्मनीमध्ये स्थलांतर केले होते होते. ही भिंत बांधल्यानंतर हे पलायन जवळजवळ संपुर्णपणे संपुष्टात आणण्यात आले.
परंतु ८०च्या दशकाच्या अखेरीस जगभरच्या कम्युनिस्ट राजवटी कोसळू लागल्या. त्यमुळेच सामर्थ्य व हुकुमत गमावू लागलेल्या पूर्व जर्मनीचे पाश सैल होऊ लागले.
वाढत्या जागतिक दबावामुळे ९ ऑक्टोबर १९८९ रोजी पूर्व व पश्चिम जर्मनीमध्ये क़रार झाला. या करारानुसार नागरिकांना सीमा ओलांडुन जाण्याची परवानगी देण्यात आली.
तेव्हापासूनच या दोन देशांच्या विलिनिकरणाची प्रक्रिया सुरू झाली व बर्लिनची भिंत टप्याटप्याने पाडुन टाकण्यात आली. ही घटना १९९० मध्ये झालेल्या दोन जर्मन राष्टांच्या एकत्रीकरणाच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा मानला जातो.
दोन्ही जर्मनींनी आपापले स्वतंत्र अस्तित्व झुगारून दिले, त्या घटनेला आज २९ वर्षे झाली. या काळात जर्मनीने प्रगतीची प्रचंड घोडदौड करून युरोपीयन समुदायात अग्रभागी स्थान मिळवले.
कम्युनिस्ट सोव्हिएट युनियनच्या पतनानंतर पूर्व युरोपात झेकोस्लेव्हाकिया, युगोस्लाव्हिया या सारखे अनेक देश फुटले व सर्वच गरीब झाले. याच काळात जर्मनी मात्र जोडली गेली व समर्थ झाली.
एकीचे बळ असे असते!