बोलका कॅमेरा!
डॉ.भारतकुमार राऊत
(लेखक हे राज्यसभेचे माजी सदस्य आणि महाराष्ट्र टाइम्सचे माजी संपादक आहेत)
शालेय जीवनात साधा बाॅक्स कॅमेरा घेऊन उद्याने, जंगले, डोंगरवाटा तुडवणारा तरुण केवळ अंगिभूत कला व अथक परिश्रम या भांडवलावर राज कपूर, ऋषिकेश मुकर्जी या दिग्गज चित्रपट दिग्दर्शकांच्या गळ्यातील ताईत बनतो व दिलीप कुमार, देव आनंदपासून राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, मीना कुमारी, मधुबाला, नूतन, वैजयंतीमाला, नर्गीस, माधुरी दीक्षितपर्यंत शेकडो अभिनेते अभिनेत्रींना आपल्या कॅमेऱ्यात कैद करतो. असा हिंदी चित्रपटसृष्टीत तीन दशके कॅमेऱ्यामागे काम करणारा मुरब्बी मराठी कलाकार जयवंत पाठारे यांचा आज स्मृतिदिन.
चित्रपट निर्माता म्हणून राज कपूर यांचा उदय होईपर्यंत चित्रपटांत प्रकाश योजना करणारा तंत्रज्ञ म्हणून काम करणाऱ्या पाठारेंच्या हातात राज कपूर यांनी 'आह' चित्रपटासाठी कॅमेरा दिला. हा चित्रपट यशस्वी ठरला नाही, पण पाठारेंचे काम राज कपूरना आवडले. त्यांनीच ऋषिकेश मुकर्जींकडे 'अनाडी'साठी पाठारेंच्या नावाची जोरदार शिफारस केली.
पाठारेंनी आनंद, अभिमान, अनाडी, अनुपमा, छाया, सत्यकाम, गोलमाल या सारखे अनेक दर्जेदार चित्रपट दिले. त्यांना राष्ट्रीय व फिल्मफेअरचे पुरस्कारही मिळाले पण त्यामुळे ते कधी हुरळून गेले नाहीत. ते शांतपणे आपले काम करत राहिले.
सतत कामात व्यग्र राहणारे, काहीसे अबोल पाठारे १९९८ साली दिवशी आपल्यातून कायमचे निघून गेले. ते फारसे बोलत नसले, तरी त्यांचा कॅमेरा सर्व काही बोलायचा, हेच खरे.