लायन्स आय केअर सेंटरचा खोपोलीत शुभारंभ
कोव्हिड 19 चा कहर जगभरात सुरू असताना इतर आजारांनाही तेवढेच गांभीर्याने घेण्याचा दृष्टीकोन ठेवून लायन्स क्लब ऑफ खोपोलीने "आय केअर सेंटरचे" उदघाटन करत आपल्या सेवाभावी उपक्रमांची शृंखला निरंतर ठेवली असल्याने नागरिकांत समाधान झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
जनसामान्यांना दिवसागणिक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गरीब गरजूंना आपल्या आजारांकडे दुर्लक्ष करून पैशाचा ताळमेळ सांभाळावा लागतो आहे, त्यामुळे त्यांना असलेले आजार हाताबाहेर जाऊन ते बाळावण्यापेक्षा सेवाभावी तत्वावर आरोग्य विषयक उपक्रमांना प्राधान्य देणाऱ्या लायन्स क्लबने डायलेसीस सेंटर उभारणी नंतर साधारणतः सहा महिन्याच्या आत डोळ्यांवर उपचारासाठी सेवाभावी तत्वावर आय सेंटर सुरू केले असल्याची भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
खोपोली शहराच्या प्रथम नागरिक तथा नगराध्यक्षा सुमन औसरमल, गार्गी एच ए या आस्थापनेचे विनोद कपूर, ला. राकेश चौमल -डिस्ट्रिक्ट गव्हर्नर, खोपोल नगर पालिकेचे मुख्याधिकारी गणेश शेटे इत्यादी मान्यवर उदघाटन प्रसंगी उपस्थित होते. दिलीप पोरवाल, राजेंद्र केजरीवाल, अशोक खंडेलवाल, उदय साखरे, बाळाराम म्हात्रे या जेष्ठ लायन्स मेंबर्सचे मार्गदर्शन या उपक्रमास लाभले. खोपोली क्लब खोपोलीचे विद्यमान अध्यक्ष रमेश पाटील, अंकुश धायगुडे, विकास नाईक, अल्पेश शहा यांनी या उपक्रमात विशेष मेहनत घेतली. आरोग्यविषयक शासकीय निकष पाळून, खोपोली आणि परिसरातील सामाजिक, राजकीय तसेच शैक्षणिक क्षेत्रातील पदाधिकारी आणि मान्यवर या उदघाटन प्रसंगी उपस्थित होते.
खालापूर तालुक्यातील प्रसिद्ध अशा "गार्गी एच. ए. प्रायव्हेट लिमिटेड" या कंपनीने या सेवाभावी उपक्रमाला आर्थिक सहकार्य केल्याने त्यांचे कौतुक होत आहे. डोळ्यांची तपासणी, उपचार आणि शस्त्रक्रिया या ठिकाणी होणार आहेत. काही सेवा अत्यल्प दराने पुरविल्या जाणार आहेत.