संजय गांधी निराधार योजना सर्वसामान्यांच्या हिताची
उमेश पाटील-सांगली
शासनाकडून सुरू असलेली संजय गांधी निराधार योजना ही सर्वसामान्यांच्या हिताची व आधारभूत ठरणारी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांना आर्थिक आधार मिळाला आहे. संजय पाटील यांच्या निवडीने वाळवा तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या कार्याला आणखीन गती मिळणार असल्याचे प्रतिपादन डॉ. संजय भोसले यांनी केले.
चिकुर्डे ता. वाळवा येथे वाळवा तालुका संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षपदी संजय पाटील (बापू) यांची निवड झाल्याबद्दल राजारामबापू सेवा सोसायटी चिकुर्डे व कुसुमताई राजारामबापू दूध संस्था चिकुर्डे यांच्याकडून सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय भोसले म्हणाले, राष्ट्रवादी पक्षाच्या तालुकास्तरावरील सामाजिक कार्यात संजय पाटील यांचा पहिल्यापासूनच हिरिरीने सहभाग राहिला आहे. मंत्री जयंत पाटील यांच्या सोबत ते नेहमीच सामाजिक कार्यात व राजकारणात कायम आहेत. त्याबरोबरच राजारामबापू उद्योग समुहाच्या काही संस्थातून विशेष कामगिरी संजय पाटील यांनी आजपर्यंत बजावलेली आहे. त्यांच्या आजपर्यंतच्या या विशेष सामाजिक कामगिरीबद्दल मंत्री जयंतराव पाटील साहेब यांच्याकडून त्यांना वाळवा तालुका संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षपदावर संधी देण्यात आली आहे. संजय पाटील कार्यतत्पर व सर्वसामान्य लोकांना न्याय देणारे व्यक्तिमत्त्व असल्याने निश्चितच संजय गांधी निराधार योजनेच्या वाळवा तालुक्यातील कामकाजात वेगळा ठसा त्यांच्या माध्यमातून उठविला जाईल.
यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे नूतन अध्यक्ष संजय पाटील म्हणाले, मंत्री जयंत पाटील यांच्याकडून नेहमीच सर्वसामान्यांच्या हिताला प्राधान्यक्रम दिला जातो. गेली अनेक वर्षापासून जयंत दारिद्र्य निर्मूलनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या शैक्षणिक, आरोग्यविषयक तसेच इतर सोयीसुविधांच्या करिता प्रयत्न केले जात आहेत. संजय गांधी निराधार योजनेच्या सर्वसामान्यांच्या सोयीसुविधांच्या कार्याला माझ्या माध्यमातून निश्चितपणे चांगला वेळ देण्याचा प्रयत्न आगामी काळात माझ्याकडून होईल.
यावेळी चिकुर्डे येथील राजारामबापू सोसायटीचे व कुसुमताई राजारामबापू दूध संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय भोसले, माजी उपसरपंच अशोक सरनाईक, वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष संदीप सूर्यवंशी आदीसह राजारामबापू सोसायटी व कुसुमताई राजारामबापू पाटील दूध संस्थेचे संचालक सभासद उपस्थित होते.