पूर्वा दिवकरचा स्तुत्य उपक्रम
राजेश भिसे-नागोठणे
येथील ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी मोहन दिवकर यांची कन्या पूर्वा दिवकर दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात शेवटच्या वर्षात शिक्षण घेत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महाविद्यालय अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आले आहे. विद्यालयात शिक्षण देणे शक्यच नसल्याने संबंधित विद्यार्थ्यांना त्यांच्या गावातच विविध उपक्रम राबविण्यात यावे असे महाविद्यालयाकडून सूचना देण्यात आली आहे.
पूर्वाचे मूळ गाव रोहे तालुक्यातील यशवंतखार हे असून त्या अनुषंगाने या विद्यार्थिनीने याच गावातील काशिनाथ धुमाळ आणि इतर शेतकऱ्यांच्या शेतात जावून सुधारित भात लागवडीमुळे बियाणांची ३० टक्के बचत कशी होते व त्यामुळे रोपे तयार करण्याचे श्रम, पैसे तसेच मजुरांचा खर्च कसा वाचतो हे प्रात्याक्षिकांसह दाखवून दिले. यावेळी पूर्वा दिवकरने शेतकऱ्यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये कोंबडीच्या पिल्लांना राणीखेत हा रोग येऊ नये यासाठी लासोटा लस कशी दिली जाते, पावसाळ्यानंतर आंब्याच्या पालवीला कीड व इतर रोगांपासून वाचविण्यासाठी औषधांची फवारणी कशी करायची, हे सुद्धा प्रात्यक्षिक करून दाखविले. या भागात असणारी शेती पारंपारिकरित्या केली जात असल्याने या नवीन तंत्रज्ञानाचा आम्हाला निश्चितच फायदा होईल अशी भावना या शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केली.