सातारा नगर पालिकेतील ३६ कर्मचाऱ्यांचा वेतनाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवल्याबद्दल आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा कर्मचाऱ्यांनी केला सत्कार ...
कुलदीप मोहिते-कराड
सातारा नगर पालिकेतील वसुली विभाग, नागरी सुविधा केंद्र, बांधकाम विभाग, पाणीपुरवठा, शहर विकास, भांडार, पेन्शन विभाग, आस्थापना, अंतर्गत लेखापरीक्षण, लेखापाल विभाग आदी विभागातील ३६ कर्मचाऱ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून ५ व्या वेतन आयोगाप्रमाणेच वेतन मिळत होते. ६ वा आणि ७ व्या वेतन आयोगानुसार त्यांना वेतन मिळत नव्हते. यासाठी या कर्मचाऱ्यांची प्रशासकीय लढाई सुरु होती. याबाबत या कर्मचाऱ्यांनी वर्षभरापूर्वी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेऊन न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती. त्यावेळी आ. शिवेंद्रसिंहराजे हे स्वतः या कर्मचाऱ्यांसोबत मुंबई येथील नगर परिषद संचालनालय कार्यालयात गेले आणि तेथील अधिकाऱ्यांना भेटून या कर्मचाऱ्यांचा वेतनाचा प्रश्न तातडीने सोडवण्याच्या सूचना केल्या होत्या. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या सूचनेनुसार संबंधित अधिकाऱ्यांनी प्रशासकीय बाबींची पूर्तता केली आणि अखेर गेल्या कित्येक वर्षांपासून ६ व्या आणि ७ व्या वेतन आयोगापासून वंचित असलेल्या या ३६ कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला.
याबद्दल सातारा पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सुरुची येथे जाऊन आ. शिवेंद्रसिंहराजे यांची भेट घेतली आणि त्यांचा सत्कार करून आभार मानले.